संजय देरकर यांच्या हातात आता ‘धनुष्यबाण’
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर विराम
जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तसेच चारवेळा विधानसभा निवडणूक लढणारे संजय देरकर यांनी अखेर 4 जानेवारीला सर्व चर्चांना विराम देत शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हाती घेतले. पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगनवार यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे भगवा शैला खांद्यावर घेतला. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन गाठ बांधली. संजय देरकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तुल्यबळ दुप्पट होणार अशी चर्चा आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी संजय देरकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनात आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्याच्या मोबदल्यात मुंबई येथून देरकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे वचन देण्यात आल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीत संजय देरकर यांना मारेगाव तालुका गटातून शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली. बँकेची निवडणूक जिंकल्यावर संजय देरकर शिवसैनिक होणार असल्याचे आधीच ठरल्याचे बोलले जाते.
2019च्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षातर्फ़े संजय देरकर यांना तिकीट मिळण्याकरिता खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र वेळेवर दिल्लीवरून माजी आमदार वामनराव कासावार यांचे नाव निश्चित करण्यात आले. संजय देरकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली व त्यात तब्बल 25 हजार मते घेऊन ते तिसऱ्या नंबरवर राहिले.
यापूर्वी 1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढून 27202 मते घेऊन दुसऱ्या नंबरवर राहिले होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून 41,330 मते व 2014 च्या निवडणुकीत पुन्हा घड्याळ चिन्हावर 31,221 अशी भरघोस मते संजय देरकर यांना मिळालीत.
वणी मतदार संघात मोठ्या संख्येने मतदार संजय देरकर यांचे चाहते आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना अधिक बळकट होणार हे निश्चित.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा