बनावट तंबाखू व सुपारी व्यावसायिकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
फसवणूक, अन्न व सुरक्षा मानक कायदा, रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेडमार्कसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल
जितेंद्र कोठारी, वणी: अस्सलच्या नावावर बनावट सुपारी तसेच प्रतिबंधित सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या वणी येथील आरोपी दीपक चावला याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गुरुवार 7 जानेवारी रोजी वणी पोलिसांनी चिखलगाव येथील महादेव नगरीत राहणाऱ्या दीपक चावला याच्या घरात असलेल्या कारखान्यावर धाड टाकून अस्सलच्या नावावर डुप्लिकेट सुपारी व तंबाखू पॅकिंग करण्याचा माल पकडला होता.
फिर्यादी मो. अशफाक शेख इमाम व मो.अशफाक फारुख कलीवाला रा. नागपूर यांनी ट्रेडमार्क व FSSI परवाना प्राप्त डायमंड गोल्ड जीबी दांडिया व वीनस चारमिनार गोल्ड कच्ची सुपारीची वणी येथे बनावट पॅकिंग व विक्री होत असल्याची तक्रार दिली होती.
पोलिसांनी आरोपीच्या घरातून पाऊच पॅकिंग करण्याची ऑटोमॅटिक स्टील मशीन किंमत 236000 रु., स्पीड एअर कॉम्प्रेसर किंमत 50,000 रु., पाऊच प्लास्टिक रोल 17 किलो किंमत 4250 रु., कच्ची सुपारी 365 किलो किंमत 1,67, 900 रु., खुला तंबाखू 37 किलो किंमत 11,100 रु., तसेच ईगल ब्रँड सुगंधी हुक्का शिशा तंबाखू व डायमंड गोल्ड व चारमिनार सुपारीचे भरलेले व रिकामे पाऊच, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पॉलिसील मशीन असे एकूण 5,34,609 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध कलम 420, 482, 486, 269, 270, 272, 273, 188, 328 भा.दं.वि. सहकलम 103, 104 रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेडमार्क ऍक्ट सहकलम 59 अन्न व सुरक्षा मानके कायदा सन 2006 अनव्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहे.
रॅकेटचा सूत्रधार शोधण्याचा पोलिसांपुढे आवाहन*
आरोपी दीपक चावला यांनी दांडिया, चारमिनार, मजा, ईगल कंपनीच्या पॅकेटची हुबेहूब नक्कल असलेले पाऊच कुठून खरेदी केले. आरोपी रॅकेटचा छोटा मोहरा असून खोलवर जाऊन चौकशी केल्यास या बनावट पॅकिंग रॅकेटचा खरा सूत्रधार कोण ? हे शोधण्याचे आवाहन वणी पोलिसांपुढे आहे. आरोपी डुप्लिकेट सुपारी व तंबाखू वणी व्यतिरिक्त इतर कुठे पुरवठा करीत होता काय? याचीही चौकशी करण्याची गरज आहे.
अटक केल्यानंतर पोलिसांना हवी ती माहिती आरोपीकडून मिळालेली आहे. त्यामुळे न्यायालयातून आरोपीची पोलीस कोठडी मागण्याची गरज भासली नाही.
वैभव जाधव : पोलीस निरीक्षक पो.स्टे. वणी
हेदेखील वाचा
वणीत डुप्लिकेट सुगंधीत तंबाखू व सुपारी बनवणाऱ्या कारखान्यावर धाड
हेदेखील वाचा