सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गाडेघाट येथे डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यास जबर मारहाण व शिविगाळ करण्यात आली. ही घटना सोमवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. डीपीवरून अवैधरित्या घेतलेल्या पाणी पम्पाच्या कनेक्शनबाबत विचारणा केल्यावरून व वायर जप्त केल्याच्या रागातून कर्मचा-यास मारहाण करण्यात आली. याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी चंद्रभान कृष्णाजी टोंगे (55) व गणेश चंद्रभान टोंगे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील गाडेघाट येथील महावितरणच्या डीपीवर गेल्या काही दिवसांपासून ओव्हरलोड आणि फेज जाण्याची समस्या सुरू आहे. त्यामुळे गावात नीट वीजपुरवठा सुरू नव्हता. ही समस्या सोडवण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता हेमंत मारोती लटारे (35) यांनी राहुल निंदेकर यांना पाठवले. मात्र समस्या सुटली नसल्याने ते दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास भास्कर देवगडे, राहुल ब्राह्मणे, प्रमोद अवगन, सेक्युरिटी गार्ड परमेश्वर हाकडे, सागर पानघाटे व विलास मंदुलवार यांना सोबत घेऊन गाडेगावत दाखल झाले.
त्यांनी पोलीस पाटील व गावातील काही नागरिकांना सोबत घेऊन डीपीची तपासणी केली असता त्यांना चंद्रभान टोंगे (55) व गणेश चंद्रभान टोंगे (26) यांनी त्यांच्या शेतात अवैधरित्या एलटीपोलवरून सर्विस वायर पैनगंगा नदीपात्रात टाकून 10 हॉर्सपॉवरच्या मोटारीचे कनेक्शन घेतल्याचे आढळून आले. हा वायर ठिकठिकाणी कटलेला होता. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन लटारे यांनी सदर वायर जप्त केली व चंद्रभान टोंगे आणि गणेश टोंगे यांना डीपीजवळ बोलवले.
तिथे चंद्रभान कृष्णाजी टोंगे व गणेश टोंगे पोहेचले. लटारे यांनी त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी लटारे यांना शिविगाळ करत त्यांच्यावर धावून जात धक्काबुक्की केली. वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल ब्राह्मणे यांना कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय तोडलेली वायर जप्त करण्यास मज्जाव केला. सदर प्रकाराने कर्मचारी घाबरून गेले. लटारे यांनी याबाबत वरिष्ठांना व मुकुटबन पोलीस ठाण्याला तातडीने माहिती दिली. कर्मचारी घटनास्थळावरून परत जाण्यास निघाले असता आरोपींनी त्यांना शिविगाळ करत तिथून जाण्यास रोखले. अखेर कर्मचारी तिथून कशीबशी सुटका करत परत आले.
आज मंगळवारी अभियंता हेमंत लटारे यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठले व आरोपी चंद्रभान कृष्णाजी टोंगे (55) व त्यांचा मुलगा गणेश चंद्रभान टोंगे (26) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, कर्मचा-यास मारहाण व शिविगाळ करणे याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम 353, 332, 323, 504, 506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज दोन्ही आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेचा तपास पोउनि युवराज राठोड व जितेश पानघाटे करीत आहे.
हे देखील वाचा: