जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्या माथी बोगस बियाणे मारून लाखो रुपये उकळणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कृषी विभाग जिल्हा भरारी पथक, कृषी विभाग वणी व शिरपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चोर बीटी बियाणांची 227 पाकिटे जप्त करण्यात आले. ज्याची किंमत 1 लाख 85 हजार इतकी आहे. गुरुवारी रात्री 10 वाजता दरम्यान केलेल्या कारवाईत पोलिसांनी शंकर बाबाराव लडके, रा. पुरड ता. वणी यास अटक केली आहे.
खरीप हंगामाला सुरूवात झाली असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी होत आहे. नेमकं याच गोष्टीचा फायदा घेऊन काही एजंट राज्यात प्रतिबंधित असलेली चोर बीटी कापूस बियाणं गुजरात व आंध्रप्रदेश येथून तस्करी करून शेतकऱ्यांना विकत असल्याची गुप्त माहिती जिल्हा कृषी विभागाला मिळाली होती. माहितीवरून जिल्हा कृषी विभागातील भरारी पथक, तालुका कृषी विभाग व शिरपूर पोलिसांनी गुरुवार 5 मे रोजी रात्री 10 वाजता पुरड (नेरड) येथील शंकर बाबाराव लडके (45) यांच्या घरून हॉलमार्क , बॅच नंबर, एमआरपी छापील नसलेले RPH-659 किला राघव नावाचे प्रतिबंधित बीजी 3 बियाणंचे 227 पाकीट जप्त केले.
आरोपी शंकर बाबाराव लडके विरुद्ध भारतीय बीज अधिनियम 1967 च्या कलम 7, 8, 9, 10, 11 व भादंविच्या कलम 420 यासह महाराष्ट्र कापूस अधिनियम 2009 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही कृषी विकास अधिकारी यवतमाळ राजेंद्र माळोदे, जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक दत्तात्रय आवारी, जि. कृ. अ. (सामान्य) निलेश ढाकुलकर, कृषी अधिकारी पंकज बरडे, तालुका. कृ.अ. वणी सुशांत माने, मंडळ कृ. अ. वणी आनंद बदखल, मंडळ कृ. अ. कायर पवन कावरे, शिरपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी राजू शेंडे यांनी पार पाडली.
हे देखील वाचा:
वणीतील ग्रामीण रुग्णालयात लोकांची जत्रा, पहाटे 4 वाजेपासून लसीसाठी रांगा
ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला