वणीतील ग्रामीण रुग्णालयात लोकांची जत्रा, पहाटे 4 वाजेपासून लसीसाठी रांगा

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन पुन्हा समोर, नेते प्रसिद्धीत मशगुल

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या 5 दिवसांपासून शहरातील कोरोनाचे लसीकरण बंद होते. आज पासून ग्रामीण रुग्णालयात 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी तसेच 18 वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र या लसीकरणाचे कोणतेही नियोजन न केल्याने ग्रामीण रुग्णालयात पहाटेपासूनच नागरिकांची जत्रा भरली. यातील काही नागरिक तर पहाटे 4 वाजेपासून रांगेत लागल्याची माहिती आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील सर्वसाधारण रुग्णांची भर पडली. मुख्य म्हणजे या कडक उन्हातच अनेक वृद्ध थांबलेले आहेत. 

ग्रामीण रुग्णालयातील परिसरात मंडप टाकून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. इथे आधी 45 वर्षांपासून अधिक वय असणा-यांचे लसीकरण सुरू होते. आज गुरुवारी दिनांक 6 मे पासून या ठिकाणी 18 वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण सुरू झाले. 45 वर्षांवरील नागरिकांची गर्दी आणि त्यातच 18 वर्षांवरील व्यक्तींची एकाच वेळी गर्दी उसळली. दरम्यान 8.45 वाजताच्या सुमारास प्रशासनातर्फे 45+ साठी दुसऱ्या इमारतीमध्ये लसीकरण असल्याचे अनाउंस केले. त्यानंतर सगळे लोक इकडून तिकडे सैैरावैरा पळू लागले. या गोंधळामुळे इथले ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले. लस घेतल्यानंतर विश्रांतीसाठी इथे कोणतीही व्यवस्था नसल्याने लोक उन्हातच आसरा घेत असल्याचेही चित्र इथे दिसत आहे.

लसीकरण केंद्रावर प्रशासनातर्फे केवळ रजिस्ट्रेशन केलेल्या व्यक्तींनाच लस मिळणार असे वारंवार सांगण्यात आले. मात्र लस मिळणार याच्या आशेने अनेक लोक तिथेच थांबलेले आहेत. यातील काही परतही गेलेत. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र ही जत्रा बघून ते देखील हतबल झाले आहे. गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी अपु-या नियोजनामुळे गोंधळ सुरू होता. मात्र यापासून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. परिणामी लोकांना या महामारीत लसीकरणासाठी जीव धोक्यात घालून धडपडावे लागत आहे.

नागरिकांची जत्रा का भरली?
गेल्या 5 दिवसांपासून लसीकरण बंद होते. त्यामुळे लसीकरणासाठी लोक रोज तिथे जायचे. आज पासून 18 वर्षांवरील तरुणांना लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती पसरली. यासाठी काहींनी आधीच रजिस्ट्रेशन केले. सध्या 45 वर्षांवरील रजिट्रेशन केलेल्या तसेच ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन केलेल्या व्यक्तींना देखील लस दिली जाते. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनने देखील लस मिळणार या आशेने 18 वर्षांवरील व्यक्तींनी इथे एकच गर्दी केली. कोरोनावर वॅक्सिन (लस) हा एकच उपाय असल्याची माहिती सध्या मीडियातून दिली जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लस मिळावी यासाठी सर्वांचेच प्रयत्न आहेत. त्यामुळे आजपासून लसीकरण पुन्हा सुरू होणार हे कळताच तिथे सर्वांनीच एकच गर्दी केली.

नेते मंडळी व लोकप्रतिनिधी केवळ प्रसिद्धी पत्रकापुरतेच
दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक गंभीर आहे. इथे पुरेशा आरोग्य सेवेच्या बाबतीत वानवा आहे. मात्र या परिस्थितीतही नेते मंडळी व लोकप्रतिनिधी मात्र प्रसिद्धी पत्रक व निवेदनातच गुंतलेले आहे. याचे पुढे काहीही होताना दिसत नाही. मोठा गाजावाजा करून या परिसरात लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी विश्रामकक्षाची स्थापना करण्यात आली होती. मात्र ते सध्या कुठेही दिसत नाही. 5 दिवसानंतर एकाच वेळी लसीकरणासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. एकाच वेळी दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरू केल्याने गर्दी उसळणार त्यामुळे योग्य ते नियोजन करणे गरजेचे होते, मात्र अशी दुरदृष्टी ना राजकीय नेत्यामध्ये दिसून आली ना लोकप्रतिनिधींमध्ये. त्यामुळे जीव मात्र सर्वसामान्यांचा धोक्यात आला आहे.

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन वारंवार समोर
सध्या ग्रामीण रुग्णालयातील नियोजन हे तीन अधिका-यांच्या डोला-यावर आहे. यातील एका अधिकारी हे एक आठवडा सुटीवर होते. त्यानंतर ते आता पुन्हा 3 दिवसांसाठी सुटीवर आहेत. दुसरे अधिकारी 15 दिवसांपासून सुट्टीवर आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण डोलारा हा एकाच अधिका-यावर आहे. दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी हे कुणाचेच  फोन उचलत नसल्याने त्याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेकांनी ‘वणी बहुगुणी’जवळ ही आपबिती बोलून दाखवली. शहरालगत असलेल्या चिखलगावसारख्या छोट्या गावातही लसीकरण सुरू आहे. मात्र तिथे योग्य ते नियोजन केले गेले आहे. लसीकरणासाठी नाव अनाउंस केले जाते. त्यानंतरच त्या व्यक्तीला लस दिली जाते. हे नियोजन मात्र ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला काही जमू शकले नाही.

सध्या कोरोनामुळे परिसरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. अनेकांची बेडसाठी धडपड करत आहे. त्यातच आता वॅक्सिनेशनसाठी नागरिकांची धावपळ सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णाने तालुक्यात द्विशतकी मजल मारली. मात्र अद्याप देखील याचे ना प्रशासनाला, ना लोकप्रतिनिधींना ना नेते मंडळींना सोयरसुतक आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

या ठिकाणी काय परिस्थिती आहे याची प्रचिती हा व्हिडीओ बघून येऊ शकते. 

हे देखील वाचा:

कोरोनाचा आजही कहर, तालुक्यात 234 पॉझिटिव्ह

ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.