ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात शेतक-यांच्या फरवणी दरम्यान झालेल्या मृत्यूनं खळबळ उडवून दिली आहे. मारेगाव तालुक्यातही शेतकरी, शेतमजुरांचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेक विषबाधित झाले आहेत. मात्र या प्रकरणात मारेगाव तालुक्यात कोतवालांना जबाबदार धरण्यात आलं आहे. या प्रकरणी तहसिलदारांनी तीन कोतवालांना निलंबित केलं आहे. त्यामुळे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ अशी संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे. या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून निलंबित कोतवाल आमरण उपोषणाला बसणार आहे.
मारेगाव तालुक्यात चार शेतकरी शेतमजुरांचा फवारणी दरम्यान मृत्यू झाला तर 70 ज्या जवळपास शेतकरी शेतमजूर बाधित झाले होते. बाधित शेतक-यांना उपचारासाठी 50 हजारांच्या वर खर्च येऊनही त्यांना केवळ 5 हजारांची मदत देऊन बोळवण करण्याचा प्रकार ताजा असतानाच, आता या प्रकरणाचं खापर कोतवालांवर फोडल्याचं समोर येत आहे.
फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधा प्रकरणाची प्रशासनानं दखल घेऊन मृतांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली. तसंच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचं आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आलं होतं. पण विषबाधेचं प्रकरण समोर आल्यानं कृषी अधिकारी काय करतात हा प्रश्न उपस्थित झाला होता. कृषी अधिका-यांनी बियाण्यांची, कीटकनाशकांची माहिती कृषिसेवकांमार्फत देणे गरजेचं होते. मारेगाव तालुक्यात फवारणी दरम्यान मृत्यू झाल्याची पहिली घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. मात्र प्रशासनाला खूप उशिरा जाग आली. दरम्यान आणखी शेतकरी शेतमजुरांचा यात मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली. यात अधिका-यांवर कोणतीही कारवाई न करता थेट शेवटचा घटक कोतवालांवर कार्यवाहीचा बगडा उगारण्यात आला आहे.
कोतवाल जबाबदार आहे का?
कोतवाल हा महसूल विभागाला मदत करणारा एक मदतनिस आहे. तो पगार नाही तर मानधनावर काम करतो. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर हा कोतवाल काम करतो. अधिकाधिक कोतवाल हे आदिवासी, मागास समाजातून आलेले आहेत. जेव्हा फवारणी विषबाधेचं प्रकरण समोर आलं तेव्हा प्रशासनाकडून थातुरमातूर कार्यवाही करण्यात आली. कृषी विभागानं या संदर्भात जनजागृती करणे गरजेचं होते. कोणत्या कृषी केंद्रात अवैध कीटकनाशकं उपलब्ध आहेत यासाठी धाडसत्र सुरू करणे गरजेचं होते. मात्र कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केलं. अनेक कृषी केंद्राचे मालक हे राजकीय पक्षाशी जुळलेले आहेत. फवारणी विषबाधेचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय दबावामुळेही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली नाही अशी देखील चर्चा आहे. मात्र यावर कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार असताना गरीब, तुटपंज्या मानधनावर काम करणा-या कोतवालांवर कार्यवाहीचा बगडा उगारण्यात आला आहे.
कोतवालांच्या निलंबनामुळे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा हा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे. या विरोधात शनिवारी कोतवाल संघ मारेगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. यात अशोक केशवराव पेन्दोर (कोतवाल साजा चिंचाळा), उत्तम रामदास आत्रम (कोतवाल साजा कुंभा खंड 1), शशीकांत मधुकर निमसटकर (कोतवाल साजा मारेगाव) हे उपोषणाला बसणार आहेत. कोतवालाच्या आमरण उपोषणाला कोतवाल संघाने पाठिंबा दिला आहे.
(हे पण वाचा: शासनाकडून विषबाधीत शेतक-यांची थट्टा)
देशभरात खळबळ उडवून देणा-या फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधेच्या प्रकरणात कोणतेही विशेष अधिकार नसलेल्या, अत्यल्प मानधनावर काम करणा-या कोतवालांवर तहसिलदार विजय साळवे यांनी कार्यवाही केल्याने अधिका-यांना वाचवण्यासाठी ही कारवाई तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशी समिती इथे दाखल होणार आहे. त्यासाठी या प्रकरणी काय कार्यवाही करण्यात आली हे दाखवण्यासाठी तर कोतवालांचा बळी घेतला नाही ना. अशी चर्चा देखील रंगत आहे. या प्रकरणी वणी बहुगुणीने मारेगावचे तहसिलदार विजय साळवे यांना संपर्क साधला असता ते ‘आऊट ऑफ कवरेज एरिया’ होते.