नागेश रायपुरे, मारेगाव: सालगडी असलेला पती शेतात काम करत असताना घरी पत्नी एकटीच आहे, या संधीचा फायदा घेत शेतमालकानेच सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग केला. ही घटना तालुक्यातील घोडधरा येथे घडली. या प्रकरणी आरोपी मालकावर ऍट्रोसिटीसह विविध गुन्हे दाखल कऱण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मारेगाव तालुक्यातील घोडधरा येथे गणेश आनंदराव जीवतोडे (45) याची शेती आहे. त्यांच्या शेतात पीडितेचे पती सालगडी म्हणून काम करतात. शनिवारी दिनांक 26 जून रोजी पीडितेचे पती आरोपीच्या शेतात काम करीत होते. दरम्यान शेतमालक हा सालगड्याच्या जेवणाचा डब्बा आणण्यासाठी सालगड्याच्या घरी गेला. त्यावेळी सालगड्याची पत्नी घरी एकटीच होती.
दरम्यान आतल्या खोलीत सालगड्याच्या पत्नीचा मोबाईल चार्जिंगला लावला होता. आरोपी तिथे गेला व त्याने चार्जिंगला लावलेला मोबाईल काढून स्वत:च्या ताब्यात घेतला. सालगड्याच्या पत्नीने सदर मोबाईल परत मागितला असता आरोपीने तिला खाली पाडून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले.
संध्याकाळी पती घरी आल्यावर पत्नीने घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. अखेर या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायचा निर्णय घेतला. सोमवारी संध्याकाळी त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत आरोपी गणेश आनंदराव जीवतोडे याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम 354, 451, 506 सह ऍट्रिसिटीचा गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा: