विवेक तोटेवार, वणी: उपचारासाठी वणीत आलेल्या डॉक्टरांच्या घरी धाडसी चोरी केली. तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व 50 हजार रुपये नगदी असा एकूण 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. डॉक्टरांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की डॉ. सुरेंद्र शिवनारायण भोगे हे मारेगाव (कोरंबी) येथे राहतात. ते दिड महिना आधी आजारपणामुळे वणीत उपचारासाठी आले होते. वणीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतला. प्रकृती बरी झाल्यावरही त्यांची रुग्णालयात विजिट असायची. त्यामुळे ते वणीतील मारोती टाऊनशीप येथील एका सदनिकेत आपल्या पत्नी व मुलांसोबत राहत होते.
काल बुधवारी दिनांक 30 जून रोजी त्यांची पत्नी ही कोरंबी येथील घरी गेल्या होत्या. घराची साफसफाई करून संध्याकाळी 7 वाजता त्या घराला कुलूप लाऊन वणीला परत आल्या. मात्र आज दिनांक 1 जून रोजी सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान डॉ. सुरेंद्र यांना शेजा-यांचा कॉल आला व त्यांच्या घराचे कुलूप तोडून असल्याची माहिती त्यांना दिली.
डॉ. सुरेंद्र व त्यांच्या पत्नीने त्वरित मारेगाव (कोरंबी) गाठले. घरी गेल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळून आले. त्यांनी घरातील कपाट चेक केले असता त्यांना लॉकर तोडून चोरट्यानी सोन्याच्या अंगठ्या, गोप, मंगळसूत्र व नगदी ठेऊन असलेले 50 हजार रुपये चोरून नेल्याचे समजले. या घरफोडीत चोरट्यांनी एकूण 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
भोगे कुटुंबीयांनी त्वरित वणी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 457, 380 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेश्वर कुमरे करीत आहे.
हे देखील वाचा:
शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारे… रक्तरंजीत इतिहास असलेले फकरूवीर देवस्थान