डाळीच्या साठ्याबाबतच्या निर्णयाविरोधात आज व्यापाऱ्यांची खरेदी बंद
बाजार समितीमध्ये खरेदी बंद ठेऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध
जितेंद्र कोठारी, वणी: वाढती महागाई आणि साठेबाजीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. हा निर्णय ठोक, किरकोळ विक्रेत्यांसह आयातदार आणि दालमिलच्या मालकांसाठी ऑक्टोबर 2021 पर्यंत लागू राहणार आहे. केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला असून, तो तत्काळ प्रभावाने लागूही करण्यात आलाय. केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारीवर्गाकडून विरोध करण्यात येत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवारपासून वणी बाजार समिती अंतर्गत खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय येथील धान्य व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
केंद्र सरकारच्या या नव्या कायद्याविरोधात वणी ग्रेन आणि पल्सेस ट्रेडर्स असोसिएशनद्वारे सोमवारी सहकारी बाजार समिती सचिव तसेच खाजगी बाजार समिती व्यवस्थापकास निवेदन देऊन खरेदी बंद करण्याची सूचना देण्यात आली. यावेळी वणी ग्रेन आणि पल्सेस ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष निखिल केडीया, उपाध्यक्ष प्रकाश कावडे, प्रकाश कोचेटा, सचिव अनिल कोठारी, अजय झाडे, कोषाध्यक्ष परेश भंडारी, धनराज अग्रवाल तसेच इतर धान्य व्यापारी उपस्थित होते.
नव्या स्टॉक लिमिट कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे व ग्राहकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे. परंतु या बाबत व्यापाऱ्यांना मात्र सदर धोरण आपल्या विरोधात असल्याची भावना निर्माण झाली आहे. याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील खरेदी बंद ठेवली आहे.
नवीन स्टॉक लिमिटच्या तरतुदीनुसार भविष्यात आता व्यापाऱ्यांना साठवणुकीवर मर्यादा आल्या आहे. आता घाऊक विक्रेत्यांसाठी 200 टन डाळींची साठवणूकीची मर्यादा असेल. तथापि, यासह अशी अट असेल की, तो एकाच डाळीचा 200 टन संपूर्ण स्टॉक ठेवू शकणार नाही. डाळींचे वाढते दर लक्षात घेता सरकारने मूग वगळता इतर डाळींवर 31 ऑक्टोबरपर्यंत साठवणूकीची मर्यादा घातली आहे. आता शासनाने ठरविलेल्या मर्यादेपेक्षा व्यापाऱ्यांना कोणत्याही डाळी वा डाळींचा साठा ठेवता येणार नाही.
असे केल्याने दर वाढ नियंत्रणात राहण्या ऐवजी अनियंत्रित होऊन जाईल. शिवाय यामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान आहेच परंतु शेतकऱ्यांचाही या मध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. असे व्यापाऱ्यांना वाटते.
हे देखील वाचा: