बंदरपोड येथे वीज कोसळून 2 बैलांचा मृत्यू
वणी उपविभागात आज दुपारी विजेचे तांडव, नुकसान भरपाईची मागणी
भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील बंदरपोड (इंदिराग्राम कुंभा) येथे दुपारच्या सुमारास शेतामध्ये झाडाला बांधलेल्या बैलांवर वीज कोसळली. यात 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतक-यांचे सुमारे 1 लाखांचे नुकसान झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.
बंदरपोड येथील शेतकरी वासुदेव गणपत आत्राम यांची गावालगतच 1 हेक्टर 51 आर जमीन आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने ते शेतामध्ये डवरण्याचे काम करीत होते. आज दिनांक 7 जुलै रोजी दुपारच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वासुदेव आत्राम यांनी आपल्या दोन्ही बैलांना शेतातीलच कडुनिंबाच्या झाडाला बांधले व ते दुसरीकडे आसरा शोधत उभे राहिले.
दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आले व विजेचा कडकडाट सुरू झाला. दरम्यान झाडाला बांधलेल्या दोन्ही बैलांच्या अंगावर वीज कोसळली. यात या दोन्ही बैलांचा जागेवरच मृत्यू झाला. ऐन शेतीच्या हंगामातच दोन्ही बैलांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. या दोन्ही बैलांची अंदाजे किंमत लाखाच्या घरात आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालकाने केली आहे.