खातेरा येथे वीज कोसळून 26 बक-यांचा मृत्यू

आज दुपारपासून तालुक्यात विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस

0

सुशील ओझा, झरी: खातेरा शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या बक-यांवर वीज कोसळल्याने 26 बक-यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 4 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेत 13 पशूपालकांचे सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

झरी तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा व तेलंगणा राज्याच्या सिमेवर खातेरा हे गाव आहे. आज दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3.30 ते 4 वाजता दरम्यान परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान खातेरा येथील शेरकी गावातील बकऱ्या घेऊन शेतशिवारात गेला होता. 4 वाजता सुमारास रमेश लसने यांच्या शेताजवळ बक-या चरत होत्या. दरम्यान बक-यांवर वीज कोसळळी.

या दुर्घटनेत सुधाकर पांडे यांच्या 5 बक-या, गेडाम यांच्या 4, रवि जूनगरी 3, विकास आगरकर 2, शंकर गायकवाड 2, बळीराम गोडे 2, दशरथ बुटे 2 तर नारायण भोयर, अंबादास वासेकर, दत्ता जुनघरी, दिवाकर भोयर, धर्मराज वाघाडे, अमोल सोनटक्के यांच्या प्रत्येकी 1 बकरीचा मृत्यू झाला. या अपघातात पशुपालकांचे सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच खातेरा गावाचे सरपंच विशाल ठाकरे, पोलीस पाटील राहुल गोडे, सचिन टाले यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व पशु वैद्यकीय अधिकारी यांना माहिती देऊन बोलविण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जमादार मोहन कुडमेथे व जितेश पानघाटेसह डॉक्टर रवी गोडे व बळीराम गोडे पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

या दुर्घटनेत पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी पशुपालकांतर्फे करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.