भास्कर राऊत, मारेगाव: दारूविक्रीबाबत खोटे गुन्हे दाखल करून शिविगाळ केली असा आरोप करत करणवाडी येथील एका दिव्यांग महिलेचे ठाणेदारांविरोधात पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरू आहे. मात्र सदर कार्यवाही योग्य असून महिलेचे उपोषण एक फार्स असल्याचे गावक-यांचे म्हणणे असून त्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. गावक-यांनी तहसीलदार यांच्या मार्फत सदर कारवाईचे समर्थन करीत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना आज निवेदन दिले.
दि. 23 जून रोजी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जगदीश मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी करणवाडी येथील एका घरी धाड टाकत दारूच्या बॉटल जप्त केल्या. या प्रकरणी दिव्यांग महिला सीमा अफरोज खान व तिचा पती अफरोज खान यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान आमच्यावर करण्यात आलेली कारवाई ही चुकीची आहे. मला अपंग असतानाही शारीरिक व मानसिक त्रास दिला गेला, असा आरोप करीत दिव्यांग महिलेने 5 जुलैपासून मारेगाव पोलीस स्टेशन समोरच उपोषणाला सुरुवात केली.
मात्र या आंदोलनाविरोधात आता काही गावक-यांनी आक्षेप घेत सदर कार्यवाही ही योग्य असून ठाणेदारांवर लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत यासंदर्भात तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की सदर दारूविक्रेत्याविरोधात या आधीही दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये करणवाडी फाट्यावर आंदोलन करण्यात आले होते. या अवैध दारूविक्रीमुळे गावातील अनेक संसार उघड्यावर पडले असून लहान मुलेही या दारूच्या आहारी गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही अवैध दारूविक्री सुरू असून पोलीस निरीक्षक यांना गावकऱ्यांनीच त्यांना या अवैध व्यवसायाबाबत माहिती दिली व त्यावरून ही कारवाई केली गेली. सदर कारवाईत मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे अपंग महिलेचे उपोषण केवळ एक फार्स असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे.
यावेळी शाळा सुधार समिती अध्यक्ष राजेंद्र खडसे, तंटामुक्ती अध्यक्ष लीलाधर काळे, कीरण आडे, हिना नैताम, मारोती नैताम, प्रीतम जोगी, कविता खडसे, रेखा श्रीपतवार, रवींद्र जोगी, विमल उरकुडे, सुनील गायकवाड, मनोज वादाफळे, प्रभाकर वाटेवर, केशव बदखल, मनीषा मिश्रा, अनिता टेकाम, कवडू गारघाटे, ओमप्रकाश मिश्रा यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा:
आवडीचा ब्रँड आणून न दिल्याचा जाब विचारल्याने बार मालकाची ग्राहकाला मारहाण
शुल्लक वादावरून दोन भावांमध्ये जुंपली, एकमेकांवर काठीने प्रहार