मुंगोलीवासीयांनी घेतली मंत्री वडडेट्टीवार यांची भेट, समस्या सोडवण्याची मागणी
15 वर्षांपासून मुंगोली गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणी व निगुर्डा डीप कोळसा खाणीच्या विस्तारीकरणामुळे मुंगोली गावात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून मुंगोली गाव पुनर्वसनाचे प्रकरण लालफितशाही मध्ये अडकल्यामुळे नागरिकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडडेट्टीवार यांना साकडे घातले आहे. मुंगोली येथील युवा सामाजिक कार्यकर्ता आयुष ठाकरे यांनी सोमवार 12 जुलै रोजी याबाबत मंत्री विजय वडडेट्टीवार यांच्यासह पालकमंत्री चंद्रपूर, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार वणी, मुख्य महाप्रबंधक वेकोली यांना निवेदन दिले आहे.
वेकोलिचा 25 वर्षांपूर्वी मुंगोली कोळसा खाण हा मोठा प्राजेक्ट होता. त्यासाठी मुंगोली व आजूबाजूच्या साखरा, कोलगाव, शिवणी शिवारातील शेतजमिनी वेकोलिने संपादित केल्या. मात्र जसजसा कोळसा खाणीचा विस्तार झाला, तसतशा जमिनी संपादित केल्या. त्यानंतर निगुर्डा डीप कोळसा खाण सुरू झाली. कोळसा खाणीमुळे त्या परिसरातील उर्वरित शेतजमिनी सोडून दिल्या. त्यामुळे शेतमालाचे उत्पादन पुरेशे होत नव्हते.
कोळसा खाणीच्या ब्लास्टिंगमुळे घरावर दगड पडणे, प्रदूषण, पाणी टंचाई, गावात आजार पसरणे, विशेषत: कोळसा खाणीचे ओव्हर बर्डन (मातीचे ढिगारे) वर्धा नदी किनाऱ्यावर टाकल्याने नदीच्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशा विविध समस्या निर्माण झाल्याने सातशे लोकसंख्या असलेल्या मुंगोली गावाचे पुनर्वसन व्हावे व गाव परिसरातील शेतजमिनी संपादित करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, वेकोलि यांच्या वेळोवेळी संयुक्त बैठका झाल्या आणि सुटलेल्या शेतजमिनी वेकोलिने संपादित केल्या. सदर कोळसा खाणीसाठी ३२८ हेक्टर शेतजमिनी संपादित केल्या. शेत जमिनीचा प्रश्न सुटला असला तरी मुंगोली गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत राहिला. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न उचलून धरला.
वेळोवेळी वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या भेटी, चर्चेच्या माध्यमातून तर कधी आंदोलने करून कायद्याच्या मागार्ने पुनर्वसनाची मागणी रेटून धरली. वेकोलिने मुंगोली गावाच्या पुनर्वसनाकरिता 60 कोटींची तरतूद करून मौजा कुर्ली गट क्र. 66/1, 66/2, 66/3 व 77 मध्ये 5.8 हेक्टर जमीन भूसंपादन केली. संपादित भूखंडाचा मोबदला देऊन सप्टेंबर 2020 मध्ये मुंगोली गाव पुनर्वसन क्षेत्राचा फलकही लावण्यात आले. मात्र त्यानंतर वेकोलीद्वारे गाव पुनर्वसनची प्रक्रिया पुन्हा थंड बसत्यात टाकण्यात आली.
विशेष म्हणजे मुंगोली गाव वर्धा नदीच्या कुशीत सामावले आहे. त्यामुळे या गावाला नेहमी पुराचा धोका असताना जिल्हा प्रशासनाने मुंगोली गावाला संवेदनशील गावाच्या यादीतून वगळले आहे. एव्हढेच नव्हे तर गावाच्या आजूबाजूला वेकोलिद्वारे टाकण्यात आले ओव्हर बर्डन मातीचे मोठे मोठे ढिगारे खचल्यास अनेक घर दबण्याची भीतीही नागरिकांना आहे. त्यामुळे पुनर्वसन समस्यांचे निराकरण करण्याची मागणी मुंगोली येथील आयुष ठाकरे, विठ्ठल खंडाळकर, गणेश चोखाद्रे, मारोती ठाकरे, संदीप सोयाम, राजू शिंदे, गणेश आत्राम व इतर नागरिकांनी केली आहे.
हे देखील वाचा:
सर आली धावून, माती-मुरुम गेले वाहून… चारगाव ते ढाकोरी (बो) रस्ता 15 दिवसातच जैसे थे
आवडीचा ब्रँड आणून न दिल्याचा जाब विचारल्याने बार मालकाची ग्राहकाला मारहाण
मानवतेला काळीमा ! शौचास गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार