सावधान…. पैनगंगा नदी काठावरील 14 गावांना सतर्कतेचा इशारा
दिग्रस, दुर्भा, धानोरा गावे अतिसंवेदनशील, प्रशासन सज्ज
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील 14 गावांना महसूल विभागातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळा सुरू होताच पावसामुळे नदी नाले तदुंब भरून वाहतात. तालुक्यातील पैनगंगा नदी काठावर अनेक गावे असून त्या गावांना नदीच्या पुरामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल प्रशासनासह आरोग्य व पोलीस विभाग सज्ज झाले आहे.
तालुक्यातील धानोरा, दुर्भा, दिग्रस, दाभा, मांगली हिरापूर, खातेरा, येडशी राजूर व इतर अशा 14 गावांना पुराचा धोका आहे. तालुक्यातील कोणत्याही गावात पुरामुळे किंवा इतर कोणतेही नुकसान झाल्यास तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती समिती कक्ष उघडण्यात आले आहे. तिथे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तहसीलदार ,मंडळ अधिकारी व तलाठी यांची बैठक घेऊन नदी काठावरील गावात जाऊन सातर्कते बाबत कळवायल सांगितले तसेच गावात दवंडी द्वारे कळविण्यास सांगितले आहे. नदी काठावरील प्रत्येक गावातील दक्षता समितीची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहे. नदीकाठावरील धानोरा,दुर्भा व दिग्रस ही गावे अति संवेदनशील असून या गावाकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
कोणतीही घटना दुर्घटना घडल्यास तहसीदार,नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी,ठाणेदार डॉक्टर व इतर कर्मचारी यांचे फोन नंबर तालुक्यातील जनतेला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नदी काठावरील 14 गावाना 4 महिन्याचा म्हणजे सप्टेंबर महिन्यांपर्यंत कंट्रोलचे धान्य सुद्धा पुरविण्यात आले आहे.
नदीत पोहणा-यांनो सावधान…
नदीत पोहणार्या व्यक्तींना सूचना देऊन त्याच्या लाकडी बोटी आपत्कालीन वेळेस उपयोगात आणण्याकरिता सांगण्यात आले आहे. तसेच नदीला पूर आल्यास किंवा लोक पुरात अडकल्यास त्यांना काढण्याकरिता तहसील कार्यालयात बोटीची व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे.
पुरामुळे तालुक्यातील कोणत्याही गावात घटना दुर्घटना घडल्यास तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षाला किंवा वरील विभागातील अधिकारी व कर्मचारी याना कळवावे असे आवाहन तहसीलदार गिरीश जोशी यांनी केली आहे.
हे देखील वाचा: