जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिंदोल्या जवळील येनकच्या जंगलात शिवणी (जहांगीर) येथील एका इसमाचा मृतदेह आढळला होता. दि.13 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदर इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनाचे गुढ उकलले आहे. आरोपी देखील मृतकाच्याच गावातील आहे. अवघ्या दोन तासांमध्ये शिरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे कुणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने हत्या केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.
मृतक शेषराव गजानन पिंपळशेंडे (50) हा शिवणी (जहांगिर) येथील रहिवाशी होते. ते व्यवसायाने खासगी इलेक्ट्रिशियन होते. शेषराव यांना दारू पिण्याची सवय होती. ते कामानिमित्त शिंदोला येथे यायचे. सोमवारी दुपारी 4 पर्यंत शेषराव शिंदोल्यातच होते.
सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका गुराख्याला येनकच्या जंगलात शिंदोला ते शिवणी या रस्त्याच्या अर्धा किलोमीटर अंतरावर शेषरावचा मृतदेह आढळून आला. हा खून दगडाने ठेचून करण्यात आला होता. त्यामुळे बाजूला रक्तस्राव दिसून येत होता. विशेष म्हणजे मृतकाच्या त्याच्या अंगावरील पॅन्ट काढून होती व मृतदेह अंडरविअरवर होता. डोक्यावर दगडाने मारहाण केल्याने रक्तस्राव झाल्याचे दिसून येत होते. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले हे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतकाचा मुलगा सौरभ शेषराव पिंपळशेंडे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. आरोपीवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. ठाणेदार सचिन लुले यांनी आपले सर्व खबरी आणि सोर्स कामाला लावले. तपासासाठी तीन पथकाला कामाला लावण्यात आले.
अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा
पारंपरिक पद्धतीने केलेल्या तपासात पोलिसांना आरोपी लहू आत्राम याच्याबाबत माहिती मिळाली. हे दोघे 4 वाजेपर्यंत सोबतच होते. तसेच दुचाकीवरून येनक मार्गे निघाल्याचाही सुगावा त्यांना लागला. या मार्गाचा जास्त वापर होत नाही तसेच हा मार्ग सुनसान असतो. त्यामुळे आरोपीने तिथे आरोपीला नेले. तिथे जाऊन त्यांनी दारू पिली. त्यानंतर शिविगाळ कारण्यावरून आरोपी लहू आत्रामने शेषराव यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अवघ्या दोन तासांमध्ये शिरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
आरोपीने केले विष प्राषण
हत्या केल्यानंतर आरोपी घाबरला. त्याने कुणाला संशय येऊ नये म्हणून थोडेसे विष पिले. विष प्राषण केल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे पोलिसांना आरोपीला शेवटच्या वेळी मृतकासोबत पाहिल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता आरोपीने विष प्राषण केल्याचे कळले. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. शिरपूर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी नेहमी दारू पिऊन शिविगाळ करत असल्याच्या कारणावरून खून केल्याचे आरोपीने सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, सपोनि कवाडे, पोउपनि कांडुरे, सफौ अक्कलवार, पोहवा गावंडे, नापोकॉ अमोल कोवे, गुणवंत पाटील, प्रमोद जुनुनकर, अनिल सुरपाम, सुगत दिवेकर, विनोद मोतेराव, निलेश भुसे, गजानन सावसाकडे, अंकुश कोहचाडे, अमीत पाटील, दुबे यांनी पार पाडली आहे.
हे देखील वाचा: