रवि ढुमणे, वणी: मारेगाव तालुक्यातील फवारणीतून विषबाधा झालेल्या घटनेचे खापर कोतवाल व पोलीस पाटील यांच्यावर फोडत मारेगाव तहसीलदारांनी त्यांना निलंबित केले. परिणामी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांवर उपासमारीची पाळी आली. याविरुद्ध कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निलंबन रद्द करण्यासंबंधीचे निवेदन दिले. निलंबन रद्द न झाल्यास येत्या 6 नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा गर्भित इशारा दिला आहे.
मारेगाव तालुक्यातील फवारणीतून विषबाधा होऊन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर घटना घडल्याची कोतवालानी प्रशासनाला तोंडी माहिती पुरवली होती. कोतवाल हा अल्पशा मानधनावर काम करणारा घटक आहे. ५ हजार रुपये दरमहा व चप्पल खर्च दहा रुपये. अश्या मानधनावर काम करणाऱ्या निमसटकर,पेंदोर आत्राम या तिघांना जबाबदार धरीत तहसीलदार विजय साळवे यांनी निलंबित केले.
या घटनेने कोतवाल तसेच गाव स्तरावर कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस पाटील हे पुरते हादरून गेले आहे. या संबंधी वणी बहुगुणी न्यूज पोर्टलने ने पाठपुरावा करून वृत्तांकन केले. कोतवाल निलंबन प्रकरणाची दखल कोतवाल संघटनेने घेत निलंबन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.
अन्यथा अन्नत्याग आंदोलन छेडणार
मारेगाव तालुक्यातील विषबाधा प्रकरणात कोतवाल निलंबित झाले. त्यांचे निलंबन रद्द करून सेवा पुस्तिकेत कोणतीही नोंद न करता त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली आहे. निलंबन रद्द न झाल्यास येत्या 6 नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी जिल्ह्यातील कोतवाल संघटनेचे पदाधिकारी व कोतवाल उपस्थित होते
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.