सुशील ओझा, झरी: पकडलेले ट्रॅक्टर कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देतो असे सांगून मुकुटबनच्या ठाणेदारांनी 50 हजारांची लाच घेतली. तसेच खोटा गुन्हा ही दाखल केला असा आरोप करत मुकुटबन येथील दीपक उदकवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सह वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठाणेदार व लाच घेणा-या मध्यस्थींचे निलंबन करावे अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. जर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.
तक्रारीनुसार, मुकुटबन येथील रहिवासी असलेले दीपक उदकवार हे हॉटेल व्यावसायिक आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना रेतीची आवश्यकता होती. पाऊस सुरू असल्याने रेती मिळत नसल्याने त्यांनी ड्रायवरला रेती आणायला सांगितली. दरम्यान येडशी गावाजवळ ठाणेदार धर्मा सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर यांनी पहाटे 6 वाजता त्यांचा ट्रक्टर पकडला. कोणताही पंचनामा न करता ट्रॅक्टर जप्त करून पोलीस स्टेशनला लावला.
पोलिसांनी ट्रक्टर मालक दीपक उदकवार यांना 9 वाजता ठाण्यात बोलाविले. उदकवार ठाण्यात गेले असता ठाणेदार सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर हजर होते. दोघांनीही दीपक याला 1 लाखांची लाच मागितल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. तसेच पैसे न दिल्यास रेती चोरीचा गुन्हा दाखल करतो व महसूल विभागाकडे ट्रॅक्टर सोपवून दीड लाखाचे दंड ठोठवायला लावतो असे देखील धमकावले.
ठाणेदार सोनुने यांचे तत्कालीन रायटर सुलभ उईके यांनी मोबाईलद्वारे दीपक यांना फोन करून 1 लाखांवरून 50 हजारांच्या बदल्यात कोणताही गुन्हा दाखल न करण्याची सेटलमेंट केली. त्यानुसार 50 हजार रुपये देण्याचे कबूल झाले. ठाणेदार सोनुने व ऋषी ठाकूर यांनी 50 हजार आणण्याकरिता होमगार्ड निखिल मोहितकर यांना दीपक यांच्या हॉटेल मध्ये पाठविले.
होमगार्ड मोहितकर हे हॉटेल मध्ये गेले. त्यांनी दीपक यांच्या पत्नी जवळून 50 हजार रुपये घेतले व ठाणेदार सोनुने यांना दिले असा दीपक उदकवार यांचा आरोप आहे. मात्र 50 हजार देऊन देखील ठाणेदार व सहाय्यक फौजदार यांनी दीपक उदकवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान आकसेपोटी चालकांवर गुन्हा दाखल न करता उदकवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असा देखील तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.
दरम्यान पैशाच्या देवाणघेवाण बाबत एक ऑडिओ क्लिप परिसरात व्हायरल झाली आहे. हॉटेल व पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यास सत्य समोर येईल असा दावा उदकवार यांचा आहे. ठाणेदारांसह सहायक फौजदार ऋषी ठाकूर, ठाणेदारांचे तत्कालीन रायटर सुलभ उईके व पैसे घेऊन जाणारा होमगार्ड निखिल मोहितकार यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी दीपक उदकवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सह वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे.
हे देखील वाचा: