चिंचमंडळ येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
वीजपुरवठा खंडित केल्याने मिळेल ते पाणी पिण्याची आली वेळ
भास्कर राऊत, मारेगाव: ऐन पावसाळ्यात चिंचमंडळवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये गढूळ तसेच मिळेल ते पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. थकीत वीज बिलामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे गावक-यांवर ही वेळ आली आहे. मात्र याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याचे दिसत आहे.
चिंचमंडळ या गावाला पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जात आहेत. ग्रामपंचायतीकडे वीजेचे तब्बल 1 लाख 86 हजारांचे बिल थकीत आहे. हे वीजबिल न भरल्यामुळे वीजमंडळाकडून येथील वीजपुरवठाच खंडीत केला आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ग्रामवासीयांच्या नशीबी पुन्हा पाण्यासाठी भटकंतीच आली. 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च केल्याने आणि 15 वित्त आयोगाचा निधी जमाच व्हायचा असल्याने येथील ग्रामपंचायतच्या तिजोरीत ठणठणाट दिसून येत आहे.
गावामध्ये पिण्यायोग्य पाणी असलेल्या फक्त दोनच विहिरी आहेत. गावातील हातपंप बंद आहेत. त्याच्या बाजूला घाण पाणी वाहत जाते. तसेच गावातील शेणाच्या खड्याचे पाणी सुद्धा याच विहिरीजवळून वाहत असते. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामवासीयांना साथीच्या रोगांना सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
साधा बिलाचा हप्तासुद्धा भरायला ग्रामपंचायत मध्ये काहीच रक्कम नसल्याने ग्रामवासी संताप व्यक्त करीत आहेत. नळयोजनेची जोडणी जोडणी करीत असताना एका नागरिकांकडून हजार रुपये अशी रक्कम घेतली होती. अशा 170 नागरिकांनी जोडणी केली. त्या जोडणीचे 1लाख 70 हजार रुपये व निवडणूक काळात घरटॅक्स भरलेली रक्कम ग्रामपंचायतला जमा असायला हवी होती.
परन्तु ग्रामपंचायत तिजोरीत खणखणाट असल्याने आता कामे कशी व कोणत्या योजनेतून करावी अशा संकटात ग्रामपंचायत असल्याचे मत उपसरपंच प्रफुल विखनकर यांनी व्यक्त केले. गावामध्ये शुद्ध पाणी मिळावे यासाठी असलेली वाटर फिल्टर मशीन शुद्ध पाण्याची वाट पाहत असल्याचे दयनीय चित्र चिंचमंडळ येथे पाहायला मिळत आहे.
गावातील नागरिकांकडुन जवळपास 17 लाख 50 हजार रुपये घर टॅक्स येणे बाकी असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि गावातील छोटेमोठे काम रखडलेले आहेत. हा टॅक्स जर लवकर जमा झाला तर अनेक कामे मार्गी लावता येईल असे मतही उपसरपंच यांनी व्यक्त केले. खर्च करायला ग्रामपंचायतीमध्ये कसलाही निधी नसल्याने येथील कामांची उच्च स्तरीय चौकशीची मागणीसुद्धा उपसरपंच प्रफुल विखनकर यांनी केली आहे.
गेल्या एक-दोन महिन्यापूर्वी येथील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा येत असल्याच्या बातम्यासुद्धा प्रकाशीत झाल्या होत्या. तरीही या गावाकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
हे देखील वाचा:
मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार