विवेक तोटेवार, वणी: वेकोलितील ड्युटी संपवून दुचाकीने परतत असताना एका कर्मचा-याचा शहरालगत गुंजच्या मारोतीजवळ अपघात झाला. मधुकर गणपत वाढई असे कर्मचा-याचे नाव आहे. गाडीला रानडुकराने धडक दिल्याने हा अपघात झाला होता. त्यात मधुकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचावर नागपूर येथे उपचार सुरू होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वणीतील लक्ष्मी नगर येथील मधुकर गणपत वाढई (55) हे रहिवाशी होते. ते वेकोलित माजरी येथे नोकरीला होते. शनिवारी दि. 31 जुलै रोजी ते ड्युटी करून त्यांच्या दुचाकीने (MH29 BL0962) वणीला परत येत होते. बायपासजवळील गुंजेच्या मारोतीजवळ चौपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान 5 वाजताच्या सुमारास गुंजच्या मारोतीजवळ त्यांच्या दुचाकीला अचानक एका रानडुकराने धडक दिली.
धडक देताच ते एका दगडावर कोसळले. या वेळी वाढई यांच्या डोक्यात हेलमेट होते. मात्र त्यांचे डोके इतक्या जोरात दगडावर आदळले की हेलमेटचे तुकडे झाले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे उपाचारासाठी हलवण्यात आले.
त्यांच्यावर नागपूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र रविवारी 1 ऑगस्ट रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली व मोठा आप्त परिवार आहे. आज त्यांच्यावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे देखील वाचा:
खुमासदार राजकीय टोलेबाजीत रंगला पतसंस्थेचा शाखा उद्घाटन सोहळा