पाईपलाईनसाठी सामान आले…. पुढा-याच्या फोननंतर सामान परत गेले
भेंडाळा येथील वार्ड क्रमांक 3 ची पाणी समस्या जैसे थे, 15 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा गावातील वार्ड क्रमांक 3 मधील 10 कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नाही. याबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सदर कामासाठी सामान आले. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदर सामान परत नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जर पाणी समस्या सोडवली नाही तर 15 ऑगस्टपासून पंचायत समितीसमोर उपोषण केले जाईल असा इशारा महिलांनी दिला आहे.
यापूर्वी ग्रामवासीयांनी पाणीसमस्येबाबत ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार दिल्या होत्या. त्यानुसार गावातील पाईप लाईन दुरुस्त करण्याकरिता 8 हजारांचे सामान घेण्यात आले. हे सामान एका सदस्यांच्या घरी ठेवण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. परंतु एका राजकीय पुढाऱ्यांने अधिकारी व कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांना फोन करून सदर पाईपलाईनचे करू नये असे सांगितले. त्यावरून एका घरात ठेवलेले समान घेऊन गेल्याची माहिती सुद्धा गावकऱ्यांनी दिली.
वॉर्ड क्र 3 मध्ये बोअर मारलेला आहे. त्या बोअरला मोटर लावून पाईप लाईन जोडल्यास पाण्याची समस्या सुटू शकते. मात्र फक्त एका राजकीय पुढा-याच्या इशाऱ्यावर व दबावामुळे ही समस्या सोडवली जात नसल्याचा वार्डातील लोकांचा आरोप आहे. गावातील जनतेला मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्याचा अधिकार गटविकास अधिकारी. सरपंच व सचिवाला कोणी दिला असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जर ही समस्या सोडवली नाही तर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर 15 ऑगस्टपासून उपोषण केले जाईल असा इशारा वार्ड क्र. 3 च्या रहिवाशांनी दिला आहे. निवेदन देते वेळी मंगला आसुटकर, सीमा पानघाटे, उज्ज्वला धांडे, लता बदकी, रुंदा निब्रड, सुमन झाडे, प्रतिभा रोगे, मालाबाई ठोंबरे, विद्या पाणघाटे, अंजनाबाई पेटकर, निलिमा मोहितकर उपस्थित होत्या.
हे देखील वाचा: