नात्याला काळीमा… मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार

अत्याचाराला कंटाळून भाचीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: एका 17 वर्षीय कुमारीकेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी एका विकृत मामाच्या मुसक्या आवळल्या आहे. प्रशांत (38) असे अत्याचार करणा-याचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवाशी आहे. गेल्या वर्षभरापासून तो पीडितेवर अत्याचार करीत होता. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले.

सविस्तर वृत्त असे की पीडिता कुमारिका (17) ही शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावातील रहिवाशी आहे. ती आपल्या आजीसह राहते. आरोपी प्रशांत (38) हा राजूरा येथील रहिवाशी आहे. तो गेल्या वर्षभरापासून पीडितेच्या गावी राहायला गेला होता. तो गावातच पत्नीसह पीडितेच्या घरी राहत होता. पीडिता ही त्याच्या दुरच्या नात्यात येते. नातेवाईक असल्याने पीडितेचे मामाशी नेहमी बोलणे चालणे असायचे. मात्र मामाच्या मनात काही वेगळेच होते.

एके दिवशी मामाने पीडिता घरी एकटी असताना टीव्हीचा आवाज मोठा करून मामाने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मामाने पीडितेला सातत्याने धमकी देत हे कृत्य सुरूच ठेवले. दरम्यान पीडितेला गर्भधारणा झाली. त्यामुळे आरोपीने पीडितेचा गर्भपात करवला.

सततच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
मामाच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने 20 ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. विश प्राशन केल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. चार दिवसांनी तिला सुटी झाली. 25 तारखेला पीडितेने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत ही कहाणी पोलिसांना सांगितली. मात्र नातेवाईक असल्याने पीडिता तक्रार द्यायला कचरत होती. अखेर ती तक्रार न देताच परत गेली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी शिरपूर पोलिसांनी तातडीने पीडितेचे गाव गाठत पीडितेकडून तक्रार लिहून घेतली व आरोपी प्रशांत विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीविरोधात भादंविच्या कलम 376 (2) (N), 506, बालकांचे लैंगिक शोषण अधिनियम 2012 (पोस्को) कलम 4, 6, 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात राम कांडूरे करीत आहे.

हे देखील वाचा:

पाणी काढताना विहिरीत पडल्याने शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू

माजी नगराध्यक्ष व सुप्रसिद्ध व्यावसायिक सतिशबाबू तोटावार यांचे निधन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.