लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद

एका मित्राने दुस-याला कैचीने भोसकले, कोसारा येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: लग्न होत नसल्याने एक मित्राला तृतीय पंथी म्हटले. त्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. अखेर एका मित्राने दुस-या मित्राला कैचीने भोसकले. तालुक्यातील कोसारा येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर घटना अशी की आरोपी रुपेश दामोधर वनकर (35) व पांडुरंग होयबाजी जवादे (45) हे कोसारा येथील रहिवाशी असून ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पांडुरंग हा मजुरी करतो तर रुपेश हा न्हावीकाम करतो. फिर्यादी पांडुरंग हा रुपेशपेक्षा वयाने 10 वर्ष मोठा असूनही पांडुरंग यांचे लग्न झालेले नाही. अद्याप लग्न न झाल्याने रुपेश पांडुरंगला नेहमी चिडवित असायचा.

मंगळवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी बडगा होता. सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास फिर्यादी पांडुरंग जवादे हे एका व्यक्तीच्या घरून परत येत होते. दरम्यान गावातील चौकात आरोपी रुपेशने पांडुरंग यांना तृतीयपंथी म्हणून हिनवले. त्यावर पांडुरंगने रुपेशला असे का म्हटले म्हणून जाब विचारला.

यावर रुपेशने पांडुरंगला शिविगाळ करणे सुरू केले. वाद वाढत गेला व रुपेशने त्याच्या जवळील कैचीने पांडुरंगच्या पोटावर चार ठिकाणी वार केले. आरोपीने केलेले वार वाचवण्याकरीता पांडुरंगने मध्ये हात टाकला असता त्यांच्या करंगळीला देखील जखम झाली. वादात रुपेशने पांडुरंग यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या हल्ल्यात पांडुरंग जखमी झाला.

पांडुरंग होयबाजी जवादे यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी रुपेश दामोधर वनकर (35) याच्याविरोधात भादंविच्या कलम 326, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक राजु टेकाम करीत आहे.

हे देखील वाचा:

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

अखेर वणी नगरपाकिलेकाला मिळाले मुख्याधिकारी

मंदिरासमोरच अतिक्रमण करुन बांधले भोजनालय

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.