वणीत शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मोर्चा

आंदोलनाकडे अनेक पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी फिरवली पाठ

विवेक तोटेवार, वणी: आज केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याविरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. हे देशव्यापी आंदोलन वणीत देखील करण्यात आले. मात्र व्यापा-यांनी या बंदला प्रतिसाद दिला नाही तर पक्षांचे दिग्गज नेते आणि संघटनाने देखील या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. संयुक्त किसान मोर्चातर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवार 27 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्याच्या विरोधात ‘भारत बंद’ची हाक शेतकऱ्यांकडून देण्यात आली होती. या बंदला केंद्रातील सर्व विरोधी पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी समर्थन दर्शविले होते. याबाबत आज वणी शहरात मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी यावेळी शीवतीर्थाजवळ जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केले. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जात त्याची सांगता तहसील कार्यालयाजवळ झाली. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली.

समर्थन देणारे पक्ष व संघटनांनी फिरवली पाठ
केंद्रातील सर्व विरोधी पक्षांनी याला समर्थन दिले होते. मात्र मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचे एकही मोठे नेते दिसून आले नाही, शिवाय या पक्षाचे कार्यकर्त्यांची देखील मोर्चात विशेष नव्हती. ज्या सामाजिक संघटनांनी बंदला समर्थन दिले होते त्यांचे देखील बोटावर मोजता येणार इतके कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे जाहिरातबाजीत सर्वच नेते पुढे, मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याच्या वेळी सर्व गायब होते अशी चर्चा दिवसभर शहरात रंगली होती. विशेष म्हणजे सोशल मीडियातून शेतक-यांच्या प्रश्नावर कळवळा व्यक्त करणा-यांचा कळवळाही केवळ सोशल मीडियापुरताच दिसून आला. ते देखील आंदोनलात कुठेही नव्हते. 

बंद दरम्यान संपूर्ण शहरातील दुकाने ही सकाळी रोजसारखीच सुरूच होती. मात्र मोर्चा येताना दिसताच काही वेळ दुकानाचे शटर बंद करण्यात आले. परंतु मोर्चा जाताच पुन्हा प्रतिष्ठाने सुरू करण्यात आली. बंदचा कोणताही परिणाम बाजारपेठेवर दिसून आला नाही.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, कृषी विषयक कायदे मागे घ्यावे, खासगीकरण, महागाई इत्यादी विरोधी हे आंदोलन करण्यात आले होते. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, माकप, भाकप, वंचित आघाडी, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, शेतक-यांच्या संघटना तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.

हे देखील वाचा:

मारेगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.