वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा
आशिष खुलसंगे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यात वणी उपविभागात अतीवृष्टी झाली. त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच गुलाब चक्रीवादळाचा फटकाही मोठ्या प्रमाणात शेतक-यांना बसला. वणी उपविभाग हा सततच्या नापिकीने शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या विभागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली तसेच त्यांना निवेदन देऊन वणी, मारेगाव, झरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आर्णीचे माजी नगराध्यक्ष आरीज बेग मिर्झा देखील उपस्थित होते.
गेल्या 15 दिवसांपासून वणी उपविभागात मुसळधार पाऊस झाला. त्यातच गेल्या आठवड्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात अतीवृष्टी झाली. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृष्य पाऊसही झाला. यात परिसरातील कापूस, सोयाबिन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी अतीवृष्टीमुळे कापसाचे बोंड काळे पडले आहे. तर सोयाबिनला कोंब फुटले आहे. पिक काढायच्या वेळी पाऊस आल्याने शेतक-यांच्या तोंडचा घास हिसकला आहे. त्यामुळे वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी केली आहे.
केंद्राने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले – आशिष खुलसंगे
यंदा आपल्या भागात शेतक-यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. मात्र पावसामुळे सोयाबीन पूर्णपणे करपली आहे. त्यातच केंद्र शासनाने सोयाबीन आयात करण्याची मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आपला भाग हा शेतकरी आत्महत्येचा भाग ओळखला जातो. त्यामुळे वणी उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे.
– आशिष खुलसंगे, झरी तालुका अध्यक्ष, काँग्रेस
परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांची व खतांची विक्री होते. परिणामी शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे यावरही कारवाई करावी अशी ही मागणी खुलसंगे यांनी यावेळी केली.
हे देखील वाचा:
मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5
Comments are closed.