मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खुनाचा गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात... आरोपीच्या आईलाही अटक

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील वार्ड क्रमांक 8 मध्ये शेजारी शेजारी वास्तव्यास असलेल्या युवकामध्ये 11 ऑक्टोबर रोजी रात्री तुंबळ हाणामारी झाली होती. यात एक युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला यवतमाळ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दोन दिवसानंतर उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू झाला आहे. संजय वाढई असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मारहाण करणा-यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकऱणी एका विधि संघर्ष बालकास ताब्यात घेतले असून एकास अटक करण्यात आली आहे. 

न्यूज अपडेट: आरोपीच्या आईला अटक
या प्रकरणी आरोपीच्या आईला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. संजयच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या महिलांनी आज मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. तिथे त्यांनी आरोपीच्या आईला अटक करण्याची मागणी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी मारेगाव ठाण्याला भेट दिली. त्यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. अखेर आरोपीच्या आईवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वार्ड क्रमांक 8 मध्ये वाढई व लालसरे हे कुटुंब घर शेजारी आहेत. ता. 9 ऑक्टोबर रोजी रात्री मृतक संजय वाढई (28) व हर्षल उर्फ किरण लालसरे (22) तथा एक विधी संघर्षग्रस्त बालक (अल्पवयीन) यांचा मृतकासोबत किरकोळ वाद झाला. परंतु हा वाद विकोपास गेला. सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी रात्री घराजवळच मृतक संजय वाढई यास दोघांनीही पोटावर लाथा बुक्क्यानी जबर मारहाण केली.

यात संजय लक्ष्मण वाढई यास गंभीर दुखापत झाली. संजयला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वेदना तीव्र झाल्याने सोनोग्राफीसाठी वणी येथे पाठवण्यात आले. तिथून त्याला यवतमाळ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यवतमाळ येथे दोन दिवसाच्या उपचारानंतर सुध्दा प्रकृती साथ देत नसल्याने संजयचा बुधवारी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी मृत्यु झाला.

मृतकाच्या वडिलांनी मारेगाव पोलिसात फिर्याद नोंदवून हर्षल उर्फ कीरन धनराज लालसरे (23) व विधिसंघर्षग्रस्त बालक या याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांचे मार्गदर्शनात स.पो.नी राजेश पुरी, आनंद अलचेवार, अजय वाभीटकर पुढील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

मयूर मार्केटिंगमध्ये दस-यानिमित्त महासेल

Comments are closed.