भरधाव ऑटोसमोर घोडा आडवा आल्याने अपघात

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटी, अपघातात तिघे जखमी

सुरेश पाचभाई, बोटोणी: परिसरात मोकाट घोडा ऑटोला आडवा आल्याने ऑटोचा अपघात झाला. या अपघातात तिघे जखमी झाले, तर घोडा देखील जखमी झाला आहे. बोटोणी परिसरातील गोदाम पोडाजवळ मारेगाव-यवतमाळ राज्य महामार्गावर ही घटना घडली. अपघातात गंभीर जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की बोटोणी ग्राम पंचायतीमध्ये असलेल्या नानाजी नगर पोडातील व सराटी ग्राम पंचायती मधील सोनूपोड येथील काही भाविकांना केळापूर येथे जगदंबा मातेचा दर्शनासाठी जायचे होते. त्यांनी जानकाई पोड येथील एक ऑटो दर्शनासाठी ठरवला. बुधवारी रात्री ते दर्शन घेण्यासाठी गावाहून केळापूरला निघाले. रात्री दर्शन घेऊन ते पहाटे केळापूरहून परतत होते.

पहाटेच्या सुमारास गोदाम पोडाजवळ ऑटो पोहोचत असताना तिथे दोन घोडे फिरत होते. दरम्यान भरधाव जाणा-या ऑटोच्या मध्ये घोडा आडवा आला. त्यामुळे चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. ऑटोने तीन पलटी मारली. या अपघातात गणपत रामगडे (22) वर्ष रा. सोनूपोड याला जबर मार लागला तर रुपेश टेकाम राहणार सोनू पोड हा जखमी झाला. चालक समीर टेकाम वय अंदाजे 22 रा. जानकाई पोड सराटी हा किरकोळ जखमी झाला.

जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बोटोणी परिसरात दोन घोडे फिरत असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहे. या घोड्यामुळे अपघात झाल्याने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

काळी आहे म्हणत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.