दिवाळीनंतर सुरू होणार राजकिय धुरळा

निमित्त नगरपंचायत निवडणुकांचे

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाच्या प्रभावामुळे मागील अनेक महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत असलेल्या मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकींचा धुरळा दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार आहे. दिवाळीच्या फटाकेबाजीनंतर खऱ्या अर्थाने फटाके फुटण्यास सुरुवात होणार असून शहरातील अनेक इच्छुक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Podar School 2025

मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता कोरोनाचा आलेख सतत कमी असल्याने आणि शासनाने जवळपास अनेक बंधने शिथील केल्याने आता या स्थगीत करण्यात आलेल्या निवडणुका पुन्हा घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. दिवाळी झाली की लगेचच आचारसंहिता लागू शकते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या शक्यतेने काही महिने अज्ञातवासात गेलेले इच्छुक पुन्हा पेटून उठल्यागत नव्या जोमाने भेटीगाठी घेण्याच्या कामाला लागलेले आहेत. भेटी वाढल्या, विजयाचे अंदाज व्यक्त करू लागले. त्यामुळे सध्यापूरती का होईना सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड जाईल अशी आशाही अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

होणाऱ्या निवडणुका या जुन्याच आरक्षण निकषानुसार होणार आहेत. आरक्षण बदलणार नसल्याने ज्यांनी आधी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती ते पुन्हा उभे राहण्याच्या दृष्टीने चाचपणी करून पाहत आहेत. एक सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने एकट्याने निवडणूक लढणे आणि निवडून येण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागणार हे नक्की.

यावर्षी नगरपंचायत निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांची चांगलीच भाऊगर्दी होणार हे नक्की. सर्वच राजकीय पक्षांसोबत अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणात आपले नशीब आजमावून पाहण्याच्या स्थितीमध्ये असून निवडणूक काळामध्ये कशी समीकरणे असतील यावर पुढील गणित अवलंबून राहणार आहेत.( क्रमशः)

Comments are closed.