शिरपूर: अवैध रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त

● सिंधिवाढोणा ते कायर मार्गावर कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत सिंधिवाढोणा ते कायर रस्त्यावर चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर व ट्रॉली शिरपूर पोलिसांनी जप्त केली. शनिवार 27 नोव्हे.ला पहाटे 3 वाजता केलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी 1 ब्रास रेतीसह ट्रॅक्टर व ट्रॉली असे 4 लाख 4 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहे. सदर प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी पोलीस स्टाफसह कायर सिंधिवाढोणा मार्गावर सापळा रचला. पहाटे 3 वाजता दरम्यान सिंधिवाढोणा गावाकडून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरला थांबवून तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये1 ब्रास रेती भरून आढळली. ट्रॅक्टर चालकाला रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितले.

यावरून पोलिसांनी ट्रॅक्टर व रेती भरलेली ट्रॉली जप्त करून ठाण्यात आणले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक अंकुश कवडू ठमके रा. सिंधीवाढोना तसेच ट्रॅक्टर मालक मंगेश मोहितकार, रा.सिंधीवाढोना याना अटक केली. दोन्ही आरोपीविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि कलम 379,34 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 15 सह मोटार वाहन कायदा कलम 130, 177 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील -भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलीस उप अधीक्षक संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन करेवाड, हे.का. प्रवीण गायकवाड, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, अभिजित कोषटवार, दुबे, गजानन सावसाकडे यांनी केली.

Comments are closed.