तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून धावली लालपरी

संपकरी कर्मचा-यांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा चोख बंदोबस्त

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कामगार संघटनेच्या कर्मचा-याच्या विरोध डावलून अखेर तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून स. 10.20 मिनिटांनी लालपरी धावली. वणी आगाराची चंद्रपूर-यवतमाळ अशी ही बस होती. बसमध्ये 10 प्रवासी होते. अंकुश आत्राम हे या बसचे चालक आहे तर अंकुश पाते हे बसचे वाहक आहे. आज वणी आगारातून 2 बस धावणार असून जसजसे चालक कामावर रुजू होतीत तसतशी बसची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान संपकरी कर्मचा-यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संपातून बाहेर निघणा-या कर्मचा-यांचा निषेध नोंदवला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बस सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. तर संपकरी कर्मचा-यांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी दिनांक 29 ऑक्टोबर पासून राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारला होता. वणीतील आगारात दिनांक 4 नोव्हेंबरपासून सुमारे 250 कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. तेव्हापासून वणी आगारातून एकही बस धावली नाही. शासनाने पगारवाढ करून कर्मचा-यांना रुजू होण्याचे आदेश दिले आहे. मात्र याला अद्यापही कामगारांचा विरोध असून कामगारांचा संप सूरुच आहे. 

निलंबनाची धमकी, वरून येणारा प्रचंड दबाव यामुळे वणी आगारात संपावर असलेले काही कर्मचारी संपातून बाहेर पडले आहे. त्यामुळे वणी आगारातून दोन बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिली बस ही सकाळी 10.20 मिनिटानी यवतमाळ साठी निघाली. चंद्रपूर-यवतमाळ अशी ही बस आहे. तर दुसरी बस प्रवासी आले की निघणार आहे.

तणावाच्या वातावरणात बसचा प्रवास
बस निघतेवेळी कर्मचा-यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र चोख बंदोबस्तात व तणावाच्या वातावरणात बस वणी आगारातून निघाली. तसेच दुसरी बस ही फलाटावर लागली असून प्रवासी येताच ती बस देखील यवतमाळसाठी निघणार आहे. दरम्यान काही कर्मचारी संपातून बाहेर पडल्याने संपकरी कर्मचा-यांमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.

जनतेला वेठीस धरू नये – सुमेध टिपले
शासनाने मोठी पगारवाढ केली आहे. संपामुळे जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे संपकरी कर्मचा-यांनी जनतेला वेठीस न धरता पगारवाढ मान्य करून कामास रुजू व्हावे अशी मी आग्रहाची विनंती करीत आहे. सध्या वणीतून चंद्रपूर-यवतमाळ अशा दोन बस धावणार असून जसजसे चालक आणि वाहक रुजू होतीत तशा गाडीच्या फे-यांची संख्या वाढवली जाणार आहे.
: सुमेध टिपले, आगार प्रमुख

संप सुरूच राहणार – संपकरी कर्मचारी
सध्या आम्ही 250 लोक संपावर असून यातील 2-4 लोक फितूर झाले असले तरी आमच्या संपावर याचा काहीही परिणाम होणार नाही. आम्ही कर्मचा-यांच्या हक्कासाठीच संप करत असून जे कुणी फितूर होत आहे अशा कर्मचा-यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने यापुढेही सूरू ठेवणार असून कोणताही अनुचित आणि घटनाबाह्य प्रकार आमच्या कडून होणार नाही. कर्मचा-यांनीही संपातून बाहेर न पडता सहकार्य करावे व जनतेनेही आम्हाला सहकार्य करावे.
– मिलिंद गायकवाड, संपकरी कर्मचारी

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.