जब्बार चीनी, वणी: वणी वेकोलि क्षेत्रातील पैनगंगा व मुंगोली कोळसा खाणीतून विमला साईडिंगवर जाणा-या कोळश्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करून महाजनको व एमपीपीजीसीएल पॉव्हर प्लान्टमध्ये माती व राख मिश्रीत निकृष्ट दर्जाचा कोळसा पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. चांगल्या गुणवत्तेचा कोळसा हा कोळसा मंडीत चढ्या दराने विकून पॉव्हर प्लान्टमध्ये मात्र निकृष्ट दर्जाचा कोळसा पाठवण्यात येत असल्याने छोट्या व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी या काळ्याबाजाराची वरिष्ठ अधिका-यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वणीतील कोळसा मंडीत सध्या विमला साईडिंग येथून दररोज 50 ट्रक कोळश्याची आवक सूरू आहे. तर दुसरीकडे मात्र या सायडिंगवरून दररोज 100 पेक्षा अधिक ट्रक लोड करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यात वेकोलिच्या वणी क्षेत्रातील पैनगंगा व मुंगोली खाणीतून महाजनकोच्या थर्मल पॉव्हर स्टेशन पर्यंत रोड कम रेल (आरसीआर) मोडद्वारा 9 लाख टन कच्चा कोळसा पोहोचवण्याची ऑनलाईन निविदा मागवली होती. हे कार्य एन. एन. ग्लोबल मर्केटाईन प्रा. लि. व फ्युएल कॉर्पोरेशनला देण्यात आले, अशाच प्रकारचे काम एमपीपीजीसीएलच्या सिंगाची थर्मल पॉव्हर प्रोजेक्ट खंडवा या कंपनीलाही देण्यात आले आहे.
कोळसा भरलेल्या ट्रकची पोलिसांद्वारे तपासणी
विमला साईडिंगला लागून असलेल्या मोठ्या खाजगी कोळशाच्या प्लॉटवर मुंगोली खाणीतील कोळसा उतरवला जातो. येथूनच वणी, चंद्रपूर आणि आंध्र प्रदेश येथे कोळश्याची विक्री केली जात आहे. या गोरखधंद्यात मिसळली जाणारी 300 रुपये टन दराने मिळणारी चारफाईन ओरिसा येथून वॅगनने आणली जाते. चार दिवसांपूर्वी वणी पोलिसांनी चंद्रा कोल प्लांटमध्ये विमला साईडिंगकडून येणाऱ्या कोळशाच्या ट्रकची तपासणी केली होती, मात्र कागदपत्रांची पूर्तता असल्याने कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र त्यानंतर दोन दिवस तेथून कोळसा बाजारात आला नाही.
आतापर्यंत मुंगोली ते राजूर साइडिंगपर्यंत दोन लाख टन कोळसा एमपीपीजीसीएलला देण्यात आला आहे. पैनगंगा येथून सुमारे अडीच लाख टन कोळसा विकास कोल आणि एनएन ग्लोबलला देण्यात आला आहे. ज्या कंपनीला कोळसा पुरवठा करायचा आहे, त्या कंपनीने थेट कोळसा खाणीतून कोळसा साईडिंग आणावा, असे वेकोलिच्या निविदेच्या अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र या नियमांची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे.
सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी
शहरातील कोळसा बाजारात विमला साईडिंगच्या कोळशाची किंमत 5500 रुपये टन आहे. या मालासह बिलही दिले जात आहे. मात्र माल पोहोचताच हे बिल रद्द केले जाते. कारण 24 तासांच्या आत बिल रद्द करण्याची तरतूद आहे. विमला साईडिंगहून वणीपर्यंत ट्रक पोहोचण्यास दोन ते तीन तास लागतात. काही वेळा बनावट बिलेही लावली जातात. वनश्री व विमला साईडिंगचा ‘ब्लॅक’मधला कोळसा बाजारात आल्याने दोन-तीन बडे व्यापारीच व्यवसाय करू शकत आहे, तर बाकीच्या छोट्या व्यापा-यांना मात्र रिकामे बसावे लागत आहे.
साईडिंगमधून जाणाऱ्या आणि पॉवर प्लांटपर्यंत पोहोचणाऱ्या कोळशाची गुणवत्ता तपासण्यासाठी सीएसआयआर आणि सिम्फर संयुक्त तपास एजन्सी नेमण्यात आली आहे, परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. अशा स्थितीत या कोळशाच्या काळ्या बाजाराने छोटे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी छोट्या व्यावसायिकांनी सरकारकडे केली आहे.
स्वस्त दरात ब्लॅक मधला कोळसा: कोळसा पुरवठादार
लिलावतील डीओचा कोळसा 8 ते 9 हजारात विकला जात आहे, तर काही बडे व्यापारी विमला साईडिंग व वॉशरीचा ‘ब्लॅक’ मधला कोळसा 5500 ते 5800 रुपयांमध्ये देत आहेत, हा प्रकार प्रामाणिक व्यापा-यांच्या अंगाशी येणारा आहे. चांगला कोळसा महाजनको आणि एमपीपीजीसीएलला पाठवायचा सोडून तो मंडईत विकून व सरकारी कंपन्यांना दगड माती मिश्रीत माल पाठवला जात आहे. याची सीबीआय चौकशी व्हायला हवी.
: राधेश्याम अग्रवाल, संचालक नटराज कोल सप्लायर————-
भेसळ करणा-यावर कारवाई केली जाईल: मुख्य अभियंता
अशा प्रकारची भेसळ रोखण्यासाठी आम्ही आमचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. ते या सर्व कामांवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच जीपीएस बसवून ट्रकवर लक्ष ठेवले जाणार आहे. अशी भेसळ कोणी करताना आढळल्यास त्या कंपनीला काळ्या यादीत टाकू.
: एम. एल. पटेल, मुख्य अभियंता, खंडवा पॉवर प्लांट
Comments are closed.