मारेगाव नगरपंचायत निकाल: काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष, मनसेची मुसंडी
मारेगाव नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा ?
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत सर्वाधिक 5 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर सेना व भाजप प्रत्येकी 4 जागा जिंकत दुस-या क्रमांकावर आहे. यावेळी मारेगावत मनसेचे इंजन जोरदार धावले असून मनसेने मुसंडी मारत दोन जागा जिंकत शहराच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला असून राष्ट्रवादी 3 वरून 1 जागेवर आली आहे. तर 1 जागा अपक्षाने जिंकली आहे. वंचित बहुजन आघाडी व शहर विकास आघाडीला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. जाहीर झालेला निकाल बघता मारेगाव नगर पंचायतीवर महाविकास आघाडी सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मारेगाव नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 1 (सर्वसाधारण महिला) मधून काँग्रेसच्या अनिता नथ्थू परचाके यांनी 115 मते घेत भाजपच्या सुमित्रा विनोद नागोसे 108 यांचा 7 मताने पराभव केला. प्रभाग क्रमांक 2 (सर्वसाधारण महिला) मध्ये शिवसेनेच्या माला गोकुलदास बदकी यांनी 157 मते घेत काँग्रेसच्या सुषमा सतीश मस्की 152 यांचा 5 मताने पराभव केला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठी उलटफेर पाहायला मिळाली. येथून काँग्रेसने सीट नाकारलेले नंदेश्वर आसुटकर यांनी अपक्ष निवडणूक लढवत राष्ट्रवादीच्या भारत मत्ते यांचा पराभव केला. नंदेश्वर यांना 126 मतदान तर मत्ते याना 94 मते पडली. तर याच प्रभागामध्ये काँग्रेस कडून उभे असलेले विशाल किन्हेकर यांना 92 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 4 (सर्वसाधारण महिला) मध्ये मनसेच्या शेख अंजुम शेख नबी यांनी मातब्बर समजल्या जाणाऱ्या पक्षांना धोबीपछाड देत विजयश्री खेचून आणली. त्यांनी 82 मते घेत काँग्रेसच्या साधना शामदेव आस्वले यांचा पराभव केला. आस्वेल यांना 75 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 5 (सर्वसाधारण महिला) मध्ये शिवसेनेच्या वर्षाताई किशोर किंगरे यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांनी 173 मते घेत भाजपच्या अर्चनाताई माणिक ठिकरे 59 यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 6 (सर्वसाधारण महिला) मध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारत शिवसेनेचा पराभव केला. येथे हर्षा अनुप महाकुलकर यांनी 198 मते घेत शिवसेनेच्या सुलभा संजय लव्हाळे यांचा 172 पराभव केला.
प्रभाग क्रमांक 7 (अनुसुचित जमाती महिला) मध्ये काँग्रेसच्या छाया प्रदीप किनाके यांनी 100 मते घेत शिवसेनेच्या सुरेखा किसन भादीकर 92 यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 8 मध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपच्या वैभव सुभाषराव पवार यांनी 78 मते घेत काँग्रेसच्या शेख युसूफ शेख हसन 77 यांचा केवळ एका मताने पराभव केला. हा पराभव काँग्रेसला मोठा जिव्हारी लागलेला आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेच्या मनीष तुळशीराम मस्की यांनी 136 मतदान घेत काँग्रेसच्या शेख इमरान रशीद 132 यांचा पराभव केला. येथेही काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुनीता गजानन किन्हेकर यांनी 111 मतदान घेत शिवसेनेच्या फुलन सुरेश नेहारे 71 यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक 11 या अनुसुचित जाती (महिला) राखीव असलेल्या मतदारसंघात काँग्रेसच्या थारांगणा खालिद मुहंमद या विजयी झाल्या आहेत. त्यांना 144 मते मिळाली तर सेनेच्या माधूरी जितेंद्र नगराळे 85 मते घेत दुस-या क्रमांकावर राहिल्या. प्रभाग क्रमांक 12 या अनुसूचित जातीसाठी राखिव असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे हेमंत नरहरी नरांजे यांनी मनसेच्या चंदू अशोक बहादे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. त्यांना 92 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 13 हा अनुसुचित जागेसाठी राखीव होता. या प्रभागात मनसेचे अनिल उत्तम गेडाम यांनी 57 मते घेत भाजपच्या देवशिंग महादेव कोवे यांचा 11 मतांनी पराभव केला. त्यांना 46 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे आकाश युवराज बदकी यांनी 102 मते घेत सेनेच्या राजू वामण ठेंगणे यांचा पराभव केला. ठेंगणे यांना 62 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जमाती (महिला) राखीव यात सुशिला डोमाजी भादीकर या 82 मते घेत निवडन आल्या. त्यांनी मेघना सुधाकर केळकर यांचा दणदणीत पराभव केला. त्यांना अवघे 30 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 16 मध्ये राहुल राजू राठोड यांनी 84 मते घेत मनसेच्या संतोष नत्थू राठोड यांचा पराभव केला. संतोष राठोड यांना 66 मते मिळाली. तर काँग्रेसच्या गणपत वाढई यांना 64 मते मिळाली. ते तिस-या क्रमांकावर राहिले. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सेनेचे जितेंद्र मारोती नगराळे यांनी 89 मते घेत भाजपचे गणपत नामदेव राजूरकर 67 मते यांचा 22 मतांनी पराभव केला.
मनसेची मुसंडी तर राष्ट्रवादीला फटका
गेल्या निवडणुकीत खातेही न उघडता आलेल्या मनसेने यावेळी जबरदस्त मुसंडी घेत दोन जागांवर विजय मिळवला आहे. एका जागेवर मनसेचा उमेदवार अवघ्या 2 मतांनी पराभूत झाला. डॉ. महेंद्र लोढा यांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याच्या निर्णयाचा फटका राष्ट्रवादीला बसला असून राष्ट्रवादी 3 जागांवरून अवघ्या एका जागेवर आली आहे. तर ऐन वेळी सेनेचे गजानन किन्हेकर यांनी काँग्रेस प्रवेश केल्याने हाच फटका सेनेलाही बसला, तर यामुळे काँग्रेसला फायदा झाल्याचे दिसून आले. भाजपनेही गेल्या वेळी पेक्षा चांगले प्रदर्शन करीत एक जागा वाढवत 3 वरून 4 जागा मिळवल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी व शहर विकास आघाडीला यावेळी खातेही उघडता आले नाही.
नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता !
गेल्या वेळी 5 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना ठरला होता. तर भाजपने 3 जागा मिळवल्या होत्या. 4 जागा घेत काँग्रेस दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र सेना आणि भाजपने युती करीत एका अपक्षाचा पाठिंबा घेत नगरपालिकेवर सत्ता स्थापन केली होती. मात्र यावेळी निवडणुकीचे गणितही बदलले आहे. काँग्रेस सर्वांधिक 5 जागा घेत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर सेना 4 जागा घेत दुस-या क्रमांकावर आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. हाच फॉर्म्युला मारेगाव नगर पंचायतीमध्ये वापरून काँग्रेस-सेना-राष्ट्रवादी आघाडी करून महाविकास आघाडी सत्ता स्थापन करण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
सत्तास्थापनेबाबत याबाबत ‘वणी बहुगुणी’ने काँग्रेस व सेनेच्या तालुक्यातील नेत्यांना संपर्क साधला असून यावर अद्याप कोणत्याची प्रकारची चर्चा झाली नसून उद्या किंवा परवा पक्ष श्रेष्ठी यावर जो निर्णय घेईल त्यानुसार सत्ता स्थापन केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा:
Comments are closed.