विवेक तोटेवार, वणी: आज शनिवारी दिनांक 29 जानेवारी रोजी अमरावती येथून आलेल्या पोलीस महा निरिक्षक अमरावती परिक्षेत्राच्या पथकाने वणीत ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाडसत्र राबवले. या कारवाईत मटका पट्टी फाडणा-या सुमारे 35 ते 40 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शहरातील 2 अवैध तंबाखू विक्रेत्यांवरही कारवाई केल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.
प्राथमिक माहिती नुसार, आज दुपारी वणीत पोलीस महा निरिक्षक अमरावती परिक्षेत्र यांचे पथक दाखल झाले. सुमारे 20 जणांचा समावेश या पथकात होता. या पथकाने दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास शहरातील चार ठिकाणी चालणा-या मटका अड्ड्यावर धाड टाकली. यात एकता नगर येथे दोन ठिकाणांचा समावेश आहे. यातील एका ठिकाणाहून सुमारे 16 जण तर दुस-या ठिकाणाहून 5 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
सिंधी कॉलोनी जुने बस स्टँड परिसरात चालणा-या मटका अड्ड्यावरून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले तर चौपाटी बार जवळील एका मटका अड्यावरून सुमारे 10 जणांना ताब्यात घेण्यात आले. धाड टाकता सदर ठिकाणी एकच पळापळ सुरू झाली. अनेकांनी आपली दुचाकी घटनास्थळावर सोडून पळ काढला. त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवरही कारवाई
शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधी तंबाखूची देखील मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री सुरू आहे. शहरातील दोन प्रसिद्ध तंबाखू विक्रेत्यांवरही धाड टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून यात धाडीत मोठ्या प्रमाणात मजा कंपनीचा सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त केल्याची माहिती आहे. आता पर्यंत या कारवाईत दोन गाड्या भरून तंबाखू व गुटखा आणल्याची माहिती आहे.
(अद्याप ही कारवाई सुरूच असून अधिक माहिती आल्यावर ही बातमी अपडेट केली जाईल.)
Comments are closed.