भूमीपुत्रांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही- तारेंद्र बोर्डे
स्थानिकांना रोजगाराच्या मुद्यावर हिल्टॉप कंपनी विरुद्ध एकदिवसीय धरणे आंदोलन
जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा खाणीत काम करणाऱ्या कंपन्यांकडून स्थानिक युवकांना डावलून परप्रांतातील कामगारांचा भरणा केला जात आहे. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांवर होत असलेले अन्याय खपवून घेतला जाणार नाही. असा सज्जड इशारा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिला. वणी नॉर्थ एरीया अंतर्गत कोलार पिंपरी कोलमाईन्समध्ये काम करणाऱ्या हिल्टॉप कंपनीमध्ये भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्यावर शनिवार 19 फेब्रुवारी रोजी आयोजित एकदिवसीय धरणे आंदोलनात तारेन्द्र बोर्डे यांनी बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा लावून धरला.
कोलार पिंपरी माईन्समध्ये हिल्टॉप कंपनी ओव्हरबर्डन व कोळसा उत्खननचे काम करते. या कंपनीमध्ये जवळपास 400 ते 450 कामगार कार्यरत आहे. उद्योग प्रकल्पामध्ये नौकरीसाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचा कायदा असताना सदर कंपनीमध्ये फक्त 115 स्थानिक लोकांना कामावर घेण्यात आले आहे. नियमानुसार जवळपास 350 स्थानिक कर्मचान्यांचा समावेश करणे अपेक्षित आहे. परंतु कंपनीने निम्याहून जास्त परराज्यातील कामगारांना कामावर ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक भुमिपुत्रांवर मात्र अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज कंपनीच्या मुख्य गेटसमोर स्थानिक युवकांसह धरणे आंदोलन करण्यात आले.
धरणे आंदोलनामध्ये भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष व वणी नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, कोलार पिंपरी ग्रा.पं.सरपंच साधना बंडू उइके, निळापूर सरपंच पुजा बोढाले, गोवारीचे उपसरपंच रविंद्र आस्कर, अनिल बोढाले तसेच ब्राम्हणी, निळापूर, गोवारी, कोलार पिंपरी, कोना, अहेरी या गावातील अनेक युवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्थानिक कामगारांनी सुध्दा धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला. येत्या दोन दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवार दि. 22 फेब्रुवारी पासुन कामबंद आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. कामबंद आंदोलनात वरील 6 गावातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.