अखेर वणी व परिसरात पावसाची वादळीवा-यासह दमदार हजेरी
उकाड्यापासून दिलासा मात्र शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी, पेरणीच्या कामाला सुरूवात
जितेंद्र कोठारी, वणी: वळीवाचा पाऊस न झाल्याने शिवाय मृग नक्षत्र लागूनही पाऊस न झाल्याने तापमानात कोणतीही घट होताना दिसत नव्हती. मात्र शुक्रवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तब्बल दोन तास पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर रात्री ही अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या वणीकरांना रात्री वर्षाधारांनी दिलासा दिला. मात्र शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिकांची पुरती झोपमोड झाली. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा रात्रीपासून खंडित असल्याची माहिती आहे. शहरात काही ठिकाणी पहिल्याच पावसाने रस्ते तुंबल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळपासून शेतक-यांनी पेरणीच्या कामालाही सुरूवात केली आहे.
शहरात जागोजागी पाणी सांचले
संपूर्ण वणी शहरात भूमिगत गटर बांधण्यात आले आहे. तर काही ठिकाणी काम सुरु आहे. परंतु भूमिगत गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे पहिल्याच पावसात शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाण्याचे डबके सांचले. याचा सर्वाधिक फटका हा नांदेपेरा मार्गावर जैताई मंदिराच्या मागील भागास बसला या रस्त्यावर तब्बल 1 फूट पाणी भरले होते. त्यामुळे आजूबाजूच्या घरात पाणी शिरले.
वादळी वा-याने झाडे उन्मळली
शुक्रवारी रात्री झालेल्या पाऊस हा वादळी वा-यासह झालेला पाऊस होता. तालुक्यात अनेक ठिकाणी या वादळी वा-यामुळे झाडे तसेच काही ठिकाणी इलेक्ट्रिकच्या पोलला देखील नुकसान झाल्याची माहिती आहे. घोन्सा-शिबला झरी चौपाटीवर महारुखाचे मोठे झाड वादळामुळे कोसळले, हे झाड इलेक्ट्रिकच्या फिडरच्या तारांवर पडल्याने काही काळ वणी मार्ग बंद झाला होता.
सकाळपासून शेतकरी लागला पेरणीच्या कामाला
तालुक्यातील 50 टक्के शेतक-यांनी कापसाची धुळपेरणी (पाऊस येण्याआधीची पेरणी) केली आहे. तर इतर शेतकरी पहिल्या पावसाची वाट पाहत होते. शुक्रवारी दमदार पाऊस झाल्याने आज सकाळपासूनच शेतकरी पेरणीच्या कामात व्यग्र असलेला दिसून आला. या वर्षी वळीवाचा पाऊस झाला नाही. मात्र अनेक शेतक-यांनी धुळ पेरणीचा धोका पत्करला. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी पाऊस सुरूच असल्याने व जास्त पाऊस झाल्याने धुळपेरणी केलेल्या शेतक-यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर इतर शेतक-यांनी आज सकाळपासून कापसाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा:
खळबळजनक : मोहदा (वेळाबाई) चे उपसरपंच व ग्रा.प.सदस्य अपात्र घोषित
Comments are closed.