वणीत निघाला विद्यार्थी व पालकांचा भव्य मोर्चा

DAV शाळा स्थानांतराला विद्यार्थी व पालकांचा तीव्र विरोध, एसडीओंना निवेदन सादर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील सुंदरनगर येथील वेकोलिची डीएव्ही या शाळेचे घुग्गुस येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वणी परिसरातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याविरोधात तालुक्यातील पालक संतप्त झाले आहेत. हा निर्णय तात्काळ बदलवून सदर शाळा भालर येथे स्थानांतरीत करण्यात यावी अशी विद्यार्थी व पालकांची मागणी आहे. आज बुधवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थी व पालक यांनी शाळेच्या घुग्गुस येथील स्थानांतरणाला विरोध दर्शवत सदर शाळा भालर येथे सुरू करण्याबाबत एसडीओ, गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर केले.

सकाळी 10 वाजता शासकीय मैदान येथून मोर्चाला सुरवात झाली. गणवेशात विद्यार्थी पालकांसह या मोर्चाला हजर झाले होते. शासकीय मैदानावरून मोर्चा टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, शिवतीर्थ असा मार्गक्रमण करीत मोर्चाची तहसिल कार्यालयाजवळ सांगता झाली. मोर्चात विद्यार्थ्यांनी ‘सेव्ह डीएव्ही’चा संदेश देणारे विविध बॅनर आणले होते. वणीकरांनीही ठिकठिकाणी चौकात मोर्चाला भेट देत आपला पाठिंबा दर्शवला. एसडीओ यांची भेट घेत पालकांनी त्यांच्याशी शाळेसंबंधी चर्चा केली व त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

काय आहेत पालकांच्या मागण्या?
सुंदरनगर येथील डीएव्ही स्कूल ही परिसरातील एक नामवंत शाळा आहे. अत्यल्प शुल्कामध्ये येथे दर्जेदार शिक्षण मिळते. वणी व परिसरातील सर्वाधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. वेकोलिच्या खाणीतून होणा-या ब्लास्टिंगचा या शाळेच्या इमारतीवर परिणाम झाला असून यात शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही शाळा सध्या घुग्गुस येथे स्थानांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या शाळेत वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असताना तसेच घुग्गुस व परिसरातील अत्यल्प विद्यार्थी संख्या असतानाही शाळा घुग्गुस येथे का स्थानांतरीत करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करत पालक संतप्त झाले आहे. शाळेतील विद्यार्थी हे वणी सर्कलमधील आहे. त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने ते सोयीस्कर नाही. शिवाय देशातील सर्वात प्रदूषित गावांमध्ये घुग्गुसचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ते धोकादायक आहे. असा आरोप करत संतप्त पालकांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मोर्चात शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी विनंती यावेळी पालकांनी केली. जर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पालकांनी दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.