अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेतून घरी परतलीच नाही

वणी तालुक्यात मुलींच्या बेपत्ता होण्याने पालकांमध्ये वाढली चिंता

जितेंद्र कोठारी, वणी : शहरातील एका शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी गावातून शाळेत येण्यासाठी बस मध्ये निघाली. मात्र ती शाळेतही पोहचलीच नाही, आणि सायंकाळी घरीसुद्धा परतली नाही. नातेवाईक आणि तिच्या मित्र मैत्रिणीकडे शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. शेवटी मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशनला येऊन अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एका गावात राहणारी मुलगी व तिची लहान बहीण शिक्षणा निमित्त दररोज बसद्वारे गावातून वणी ये-जा करायची. दोन्ही वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेत होत्या. दि. 30 सप्टें. रोजी ती आपल्या लहान बहिणीसोबत बसमध्ये वणीत पोहचली. लहान बहिणीला तिच्या शाळेजवळच्या बसस्टॉपवर उतरवून आपल्या शाळेत जाण्यासाठी ती पुढे निघाली. शाळा सुटल्यावर लहान बहीण बसमध्ये बसून परत घरी पोहचली. मात्र अंधार झाल्यानंतरही मोठी बहीण घरी परतली नाही.

पालकांनी लहान मुलीला विचारपूस केली असता तिनं अनभिज्ञता दर्शविली. त्यामुळे वडील व काकांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता मुलगी आज शाळेत आली नसल्याचे शिक्षकाने सांगितले. त्यानंतर मुलीच्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु तिचा काही पत्ता लागला नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये त्याची 15 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यात मुली बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ
वणी तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये 15 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची अनेक घटना घडल्या आहे. यामध्ये विविध प्रलोभन व आमिष दाखवून मुलीला कुणीतरी पळवून नेल्याचे प्रकार जास्त आहे. स्मार्टफोन व सोशल मीडियामुळे असे प्रकार घडत असल्याचेही बोलले जाते. मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करुनही पळवून नेलेल्या मुलींना शोधण्यास वणी पोलीस सपशेल अपयशी ठरत आहे.

हे देखील वाचा-

आता वणीत स्लिप डिस्क व स्पॉंडीलीसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेली कायरोप्रॅक्टिक उपचार सुरू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.