लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांचे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निधन

प्रेरणादाई व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड... संपूर्ण परिसर बुडाला शोकसागरात.... असा होता प्रेरणादाई प्रवास...

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील टागोर चौकातील स्टेट बँक समोर येथील रहिवाशी असलेले व सध्या आर्मीत लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले वासूदेव दामोदर आवारी (36) यांचे मंगळवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. मंगळवारी ते अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत होते. कर्तव्यावर असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ आसाम येथील मिलीट्रीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी त्यांचे पार्थिव वणी येथे पोहोचणार आहे. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर मुर्धोनी येथील सामुदायीक प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मुळचे मुर्धोनी येथील रहिवासी असलेले व सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. दामोदर आवारी यांचे वासूदेव हे धाकटे पुत्र होते. आवारी कुटुंबाची शहरात एक सुपरिचित व प्रतिष्ठीत कुटुंब म्हणून ओळख आहे. कुटुंबातील किमान एक व्यक्ती देशसेवा, एक व्यक्ती वारकरी संप्रदाय, आरोग्य सेवा इत्यादींची या कुटुंबाची परंपरा आहे. लेफ्टनंट कर्नल वासूदेव यांनी आपले शालेय शिक्षण विवेकानंद विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी NDA येथे प्रवेश घेतला. NDA तून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आर्मीत लेफ्टनंट या पदावर रूजू झाले. त्यानंतर ते मेजर व पुढे ते लेफ्टनंट कर्नल झाले. लवकरच त्यांचे कर्नल या पदावर प्रमोशन होणार होते. 

दिवाळीत येणार होते वणीत
लेफ्टनंट कर्नल वासूदेव हे सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू झाले असले तरी परिसराशी त्यांची नाळ जुळलेली होती. ते कायम परिसरातील तरुणांच्या संपर्कात असायचे. NDA, सैन्य भरती, पोलीस भरती इत्यादींची तयारी करणा-या तरुणांना ते वणीत आले की मार्गदर्शन करायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही ते लोकप्रिय होते. एक दिलदार मित्र म्हणून त्यांची मित्रपरिवात ओळख होती. दिवाळीत ते वणीत येणार होते. अनेकांशी भेटण्याचे त्यांनी वचन दिले होते. मात्र ही भेट अपूर्णच राहिली.

गुरुवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी लेफ्टनंट कर्नल वासूदेव यांचे पार्थिव वणी येथे आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुर्धोनी येथील सामुदायीक प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. लेफ्टनंट कर्नल वासूदेव यांच्या निधनाने परिसरातील नागरिकांना मोठा हादरा बसला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. वासूदेव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ, मित्र परिवार असा मोठा आप्तपरिवार आहे.

Comments are closed.