रविवारी वणीकर प्रेक्षकांनी अनुभवला थरार… एकापेक्षा एक मॅचने गाजला दिवस

शेवटच्या बॉल पर्यंत रंगला एक सामना, तर सुपरओव्हरने झाला दुसरा सामना.... अक्षयची हॅटट्रीक, रजनिशचे 15 बॉलमध्ये अर्धशतक तर शुभमचा मैदानात धुमाकुळ...

विवेक तोटेवार, वणी: रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. संपूर्ण दिवस प्रेक्षकांनी एकापेक्षा एक मॅचचा थरार अनुभवला. एक सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला तर दुसरा सामना टाय झाला. त्यामुळे सुपरओव्हरचा थरार प्रेक्षकांना अनुभवता आला. एका सामन्यात रजनीश पांडेचे वादळ मैदानात घोंगावले. त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक केले. तर अक्षय ढेंगळे उर्फ गोलूने हॅटट्रीक घेतली. महाकाली संघाने तब्बल 128 धावांचा डोंगर रचला. तर शुभम मदान याने 11 चेंडूत धडाकेबाज 45 धावा काढल्या. या मॅचमध्ये दोन रेकॉर्ड देखील झाले. एकपेक्षा एक मॅच झाल्याने प्रेक्षकांचा रविवार सत्कारणी लागला. 

रविवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पहिला सामना 11 टायगर रोअरिंग व जय महाकाली संघ यांच्यात खेळला गेला. सुरज पावडे याच्या 11 चेंडूत 22 धावांच्या साथीने टायगर रोअरिंग संघाने 10 षटकात 86 धावांची मजल मारली. जय महाकाली संघाचे सुरवातीचे खेळाडू झटपट बाद झाले. एक वेळ अशी आली की महाकाली संघाच्या हातातून मॅच गेल्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र मिडल ऑर्डरमध्ये आलेल्या राहुल सिंग व तळाचा फलंदाज अमित मुके यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली.

शेवटची थरारक ओव्हर
7 चेंडूत जय महाकाली संघाला 19 धावा जिंकण्यासाठी हव्या होत्या. तर त्यांचे 7 गडी बाद झाले होते. त्यामुळे मॅच जवळपास महाकाली संघाच्या हातून गेली होती. मात्र अमितने 9 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार हाणला. या षटकाराने मॅचमधली रंगत आणखी वाढवली. आता एका षटकात 13 धावा हव्या होत्या. अजय मेश्रामने शेवटचा ओव्हर घेतला. पहिला चेंडू फुलटॉस होता. या चेंडूवर कोणतीही धाव मिळाली नाही. आता 5 चेंडूत 13 धावा पाहिजे होत्या. दुसऱ्या चेंडूवर राहुलने लेगसाईडच्या दिशेने षटकार हाणला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव निघू शकत असताना राहुलने धाव न घेता स्ट्राईक आपल्या हातात ठेवली. आता 3 चेंडूवर 7 धावांची गरज होती. यावेळी राहुलने फटका हाणला परंतु यावर एकच धाव मिळू शकली. आता अमित मुकेच्या हाती स्ट्राईक आली. तेव्हा 2 चेंडूत 6 धावांची गरज होती. अमितने लेसाइडच्या दिशेने जोरदार फटका लगावत चौकार हाणला. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. अमितने शेवटच्या चेंडूवर अगदी चपळतेने लेसाइडच्या दिशेने स्वीप करीत सहजतेने दोन धावा काढत महाकाली संघाने हा सामना जिंकला. (बातमीच्या शेवटी या थरारक ओव्हरची लिंक)

या सामन्याचा सामनावीर राहुल सिंग याला ठरविण्यात आले. त्याने गोलंदाजीत 2 षटकात 13 धावा देत 2 गडी बाद केले. तसेच मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगला येत 8 चेंडूवर 2 षटकार खेचत नाबाद 16 धावा केल्या.

धडाकेबाज फलंदाजी करताना राहुल सिंग

दुसरा सामना हा राजपूत रॉयल्स व माऊली मराठा संघात खेळला गेला. माऊली मराठा संघाने प्रथम फलंदाजी करीत संतोष ताजने, प्रतीक मत्ते व वैभव उलमाले यांच्या खेळाच्या जोरावर निर्धारित 10 षटकात 8 गडी गमावून 76 धावा काढल्या. लक्षाचा पाठलाग करताना राजपूत रायल्स संघाची सुरवात चांगली झाली. ओपनर आशुतोष डवरे (24) व सचिन मडावी (29) यांच्या खेळीच्या जोरावर राजपूत रॉयल्स संघाने 4 गडी बाद 77 धावंचे लक्ष्य सहज आशितोष डवरे याला या सामन्याचा सामनावीर ठरविण्यात आले. त्याने 16 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार च्या मदतीने 24 धावा केल्या. तसेच आपल्या एका षटकात 13 धावा देत 1 गडी बाद केला.

तिसरा सामना झाला टाय, फैसला सुपरओव्हरने
तिसरा सामना हा जन्नत 11 विरुद्ध एम ब्लास्टर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात जन्नत 11 संघाने प्रथम फलंदाजी करीत 10 षटकात 7 गडी बाद 81 धावा केल्या. आजही पेंटर उर्फ अक्षय धावंजेवार याने महत्वपूर्ण खेळी खेळली. त्याने 14 चेंडूत 2 षटकार व 2 चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. टारगेटचा पाठलाग करताना एम ब्लास्टर संघाची सुरवात ढेपाळली. मात्र कर्णधार शोएब खान (19) व संतोष पारखी (20) यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र काही चेंडू शिल्लक संतोष बाद झाला. शेवटच्या षटकात जिकण्याकरिता 8 धावांची गरज होती.

अक्षय ढेंगळेची हॅटट्रीक…
शेवटची ओव्हर अक्षय उर्फ गोलू ढेंगळेने टाकली. मात्र संयमी खेळी खेळणारा शोएब हा मोठा फटका मारण्याच्या नादात किपरकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर अक्षयने 2 ऱ्या चेंडूवर सादिक शेख व तिसऱ्या चेंडूवर खालिद शेख यांना त्रिफळा उडवत सामन्यातील व सिरीजमधील पहिली हायट्रिक घेतली. आता चौथ्या चेंडूवर एक धाव निघाली. दोन चेंडूत जिकण्याकरिता 7 धावा तर धावसंख्या बरोबरीकरिता 6 धावा हव्या होत्या. मोहमद आलीम यांनी पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या तर शेवटच्या चेंडूवर 5 धावा हव्या होत्या. मैदानावरील सर्व प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला होता. यावेळी अक्षय याने फूलटॉस चेंडूवर मोहमद आलीम याला चौकार खेचला व स्कोर बरोबरी झाली. सामना टाय झाला.

सुपर ओव्हरचा थरार
सुपर ओव्हर मध्ये एम ब्लास्टर संघाकडून कर्णधार शोएब खान व आला. त्याने 5 चेंडूत एक षटकारासह 11 धावा केल्या. एम ब्लास्टर संघाने 13 धावांचे लक्ष जन्नत 11 संघाला दिले. यावेळी जन्नत 11 संघाकडून प्रणय शेंडे यांनी गोलंदाजी केली. जन्नत 11 संघाकडून फलंदाजीसाठी अक्षय धावंजेवार उर्फ पेंटर आला. परंतु पहिल्या पारितील फार्म त्याला राखता आला नाही. तो चार चेंडूत 2 धावा करून बाद झाला. शेवटच्या चेंडूत प्रणय शेंडे यांनी षटकार ठोकला परंतु हा षटकार त्यांना पराजयापासून वाचवू शकला नाही. एम ब्लास्टर संघाने हा सामना 3 धावांनी जिंकला. शेवटची ओव्हर टाकणारा एम ब्लास्टर संघाचा मोहमद अरमान याला सामनावीर घोषीत करण्यात आले.. (बातमीच्या शेवटी या थरारक सुपर ओव्हरची लिंक)

छत्रपती वॉरिअर्सचा 128 धावांचा डोंगर…
चौथा सामना हा श्रीराम वारीअर्स विरुद्ध छत्रपती वारीअर्स संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात छत्रपती संघाने प्रथम फलंदाजी करीत 3 गडी गमावून धावांचा 128 डोंगर उभा केला. विपुल पटेल याने 15 चेंडूत चार चौकारासह 26 धावा केल्या. त्यानंतर रजनीश पांडे नावचं वादळ आलं. या वादळाने मैदानावर धुमाकूळ घातला. त्याने 15 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 17 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. रजनीश हा सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.

129 धावांचा पाठलाग करताना सुरवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर मारोती परचाके हा लवकर बाद झाला. परंतु त्यानंतर कार्तिक देवडे याने डाव सांभाळला. त्याने अवघ्या 20 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारच्या मदतीने 40 धावा केल्या. कार्तिक नंतर अनिकेत डवरे व बिल्ला याने डाव सांभाळला. बिल्ला बाद झाल्यावर श्रीराम संघाचा डाव संपुष्टात आल्याचे दिसत होते. परंतु लढाई अजून बाकी होती. त्याच वेळी शुभम मदान हा खेळपट्टीवर आला व त्याने चौकार व षटकाराची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 8 व्या षटकात तीन चौकार व 2 षटकार हाणत 28 धावा ठोकल्या.

शुभमचा मैदानात धुमाकुळ
शुभमने आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचविले. 7 बॉलमध्ये 10 रन्स पाहिजे होते. 9 व्या ओव्हरच्या शेवटचा चेंडूवर शुभमने षटकार खेचला. मात्र नोबॉल असल्याने 7 रन्स मिळत फ्रि हीट मिळाली. फ्रि हीट मध्ये शुभमने चौकार लगावत मॅचला एक ओव्हर बाकी असतानाच विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये शुभमला साथ दिली अनिकेत डवरे याने. त्याने 8 चेंडूत दोन चौकार व 1 षटकार ठोकत नाबाद 18 धावा केल्या. तर शुभमने फटक्यांची आतषबाजी करत 11 चेंडूत 4 चौकार व 4 षटकार ठोकत नाबाद 45 धावा केल्या. या सामन्याचा सामनावीर शुभम मदान याला ठरविण्यात आले. इतक मोठं लक्ष या स्पर्धेत पहिल्यांदाच गाठण्यात आले. छत्रपती वॉरिअर्सने अद्याप एकही सामना जिंकला नाही. मात्र धडाकेबाज स्कोअर करत त्यांनी विजयी खाते उघडण्यासाठी धावांचा डोंगर उभारला. मात्र शुभममुळे त्यांना काही विजयी सलामी देता आली नाही. (बातमीच्या शेवटी  या धडाकेबाज खेळीची लिंक)

पाचवा व अंतिम सामना रेनबो विरुद्ध आमेर नाईट रायडर यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करीत रेनबो संघाने निर्धारित 10 षटकात 8 गडी बाद 80 धावा केल्या. रेनबो कडून सर्वाधिक धावा कर्णधार मॉन्टी (20) व के पी (20) यांनी केल्या. धावसंख्येचा पाठलाग करीत आमेर संघाची सुरवात खराब झाली. सुरवातीला झालेल्या नुकसानीची भरपाई शेवटपर्यत आमेर संघ करू शकला नाही. यष्टीरक्षक तौसिफ खान डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची खेळी अपयशी ठरली. त्याने14 चेंडूत दोन षटकार ठोकत 20 धावा केल्या. आमेर संघ 7 गडी बाद 66 धावाच करू शकला. हा सामना रेनबो संघाने 14 धावांनी सहजतेने जिंकला. सामन्याचा सामनावीर रेनबो संघाचा कर्णधार मॉन्टी ठरला. अंकतालिकेत सध्या रेनबो संघ व श्रीराम वॉरिअर्स समान गुण घेऊन सध्या पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर छत्रपिती वॉरिअर्सला अद्याप खाते उघडता आले नाही.

अंकतालिका
1) रेनबो -6
2) श्री राम वारीअर्स -6
3) जन्नत 11 -5
4) आमेर -5
5) जय महाकाली -5
6) राजपूत रॉयल्स -4
7) टायगर रोअरिंग -4
8) माऊली मराठा -4
9) एम ब्लास्टर – 1
10) छत्रपती वारीअर्स – 0

शेवटची थरारक ओव्हर

सुपर ओव्हरचा थरार

रजनिश व शुभमचा मैदानात धुमाकुळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.