मानसिक परिवर्तनातून सामाजिक समरसतेचा प्रश्न सुटेल- शिवराय कुलकर्णी

वणी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे विजयादशमी उत्सव साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या देशाला चिंतनाची प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे ही या समाजातील प्राचीन शाश्वत परंपरा, मूल्य जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो. संघाचं बळ समाज आहे. समाजात समर्पित होऊन काम करण्याची शिकवण संघात दिली जाते. धर्म आमच्या आचरणाचा भाग आहे. धर्मानुकूल समाजच चिंतनातून मनुष्य निर्मितीचे काम मागील 97 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. असे प्रतिपादन विदर्भातील विचारवंत, स्तंभ लेखक शिवराय कुलकर्णी यांनी केले. ते येथील विजयादशमी उत्सवात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संत गजानन महाराज सेवा समितीचे सचिव गोपाळ मल्लूरवार हे उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हा संघचालक गोविंदराव हातगावकर, तालुका संघचालक हरिहर भागवत, नगर संघचालक किरण बुजोणे उपस्थित होते.

अतिथींच्या हस्ते शस्त्र पूजन झाल्यानंतर पूर्ण गणवेषधारी स्वयंसेवकांनी योगासन, व्यायाम योग व दंड प्रात्याक्षिक सादर केले. त्यानंतर सांघिक गीत ऍड. प्रेमकुमार धगडी, सुभाषित प्रसाद चिडले, अमृतवचन अर्जुन उरकुडे, वैयक्तिक गीत प्रवीण सातपुते यांनी सादर केले. मागील 97 वर्षात तीन वेळा बंदी आली. अनेक संकटे आली. संघाला संपवण्याचे सर्व स्तरावर प्रयत्न झालेत व अजूनही सुरू आहेत. परंतु त्यानंतरही संघ ठामपणे आपल्या विचारावर उभा आहे.

संघाने विरोधाला कधीच जुमानले नाही. संघाच्या खच्चीकरणाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. जात-पात न मानता या देशासाठी संघ काम करतो हे स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या व डाव्या विचारांच्या लोकांना मान्य नाही. त्यांनी हिंदू समाजातील जातीय अस्मितेला खतपाणी घालून ते वाढविण्याचे काम केले. पण हेच जाती- पातीत विखुरलेले लोकबहिंदू म्हणून एकत्र आलेले यांना चालत नाही.

संत महात्म्यांना सुद्धा यांनी जातीच्या चौकटीत बांधून जातीय अस्मिता वाढविली. त्यामुळे मानसिक परिवर्तनातून सामाजिक समरसतेचा प्रश्न सुटेल असा विश्वास व्यक्त करून उपस्थितांना सशक्त राष्ट्र निर्मितीच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन शिवराय कुलकर्णी यांनी केले.

अध्यक्षीय भाषण करतांना मल्लूरवार यांनी मागील 97 वर्षांपासून संघाने जी शिस्त जोपासली त्याला जगात तोड नाही असे सांगून संघप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर संघ चालक किरण बुजोने यांनी केले. सूत्रसंचालन नगर कार्यवाह निलेश चचडा व आभार प्रदर्शन नगर सहकार्यवाह कवडू पिंपळकर यांनी केले. संघाच्या या प्रगट उत्सवात शहरातही गणमान्य नागरिक माता भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.