मावळत्या वर्षात शेतकऱ्याच्या 16 आत्महत्या, पात्र मात्र दोनच
एकाही शेतकऱ्याला बोंडअळी प्रकोपाची मदत नाही
मारेगाव (ज्योतिबा पोटे): अत्यल्प पावसाळा, विषबाधा, गुलाबी बोंडअळी या कचाट्यात मारेगाव तालुक्यातील शेतकरी सापडला, त्यामुळे कर्जबाजारी, सततची नापिकी, इत्यादी कारणांमुळे मावळत्या वर्षात तालुक्यातील सोळा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र शासकिय सर्वेक्षणानुसार फक्त दोनच शेतकरी सरकारी अनुदानास पात्र ठरले आहे. त्यामुळे बाकी शेतकऱ्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केल्या हे गुलदस्त्यातच आहे.
एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकट अशा परिस्थितीत शेतकरी सापडला आहे. शासकिय धोरण हे शेतकऱ्याच्या बाबतीत ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षाचे सह शेतकरी करित असताना, तालुक्यात सरकार दरबारी फक्त सोळा शेतकऱ्याच्या आत्महत्याची नोंद करुन मदत मात्र केवळ दोनच शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
वास्तवात सोळा पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याचं दिसून येते. मात्र सरकारी यंत्रणा केवळ दोनच आत्महत्या नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून झाल्याचं म्हणत आहे. त्यामुळे हा एक प्रकारे शेतकरी कुटुंबावर अन्याय आहे.
यावर्षी ऐन हंगामात विषबाधा प्रकरणात तालुक्यातील एक शेतमजुर व तीन शेतकरी मृत झाले. त्यानंतर गुलाबी बोंडअळीचे दृष्टचक्र शेतकऱ्याच्या मागे लागले. तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या खचला. यात लोकप्रतिनिधींनी मदत करावी अशी अपेक्षा शेतक-यांची होती. मात्र येथील लोकप्रतिनिधी वेगळ्याच आविर्भात वावरत होते, त्यांना शेतक-यांप्रती काहीही देणंघेणं नसल्याचे दिसून येते. संकटातील शेतकर्याना कोणीच वाली नसल्याची भावना शेतक-यांमध्ये निर्माण झाली आहे.
यावर्षी बोंडअळीच्या आक्रमनाने शेतमालाच्या उत्पन्नात कमालीच घट झाली. पण अजून पर्यत एकाही शेतकर्यांना कवडीचीही मदत मिळाली नाही. संबंधित प्रशासनाच्या माहिती नुसार आजपर्यत बोंडअळी बाधित शेतात १०,६११ हेक्टर क्षेत्रात सर्वेक्षण केले असुन त्याचा लाभ ६२४२ शेतकर्याना मिळणार असल्याच अंदाज व्यक्त केला जात आहे. बोंडअळीच्या प्रकोपाची मदत मिळण्याचा दिवस कधी येईल याची वाट शेतकरी पाहत आहे.
उत्पन्न घटल्याने अनेक शेतकर्याच्या मुलीचे विवाह समोर ढकलण्यात आल्याचं वास्तव्य सुद्धा समोर आलं आहे. त्याला जबाबदार बियाणे कंपणी, शासनाचे धोरण असल्याचा आरोप शेतकरी करित असुन, सरकारी आकड्यानुसार सोळा आत्महत्या झाल्या, पण मदत मात्र दोनच शेतकर्यांना मिळणे म्हणजे हा शेतकर्यावरिल अन्याय असुन तालुक्यातील लोकप्रतिनिधी कोणताही आवाज उठवत नसल्याने लोकप्रतिनिधींप्रती शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.