केवळ आमचेच अतिक्रमण हटवणार की मोठ्या व्यावसायिकांचेही ?

टपऱ्यांवर बुलडोजर, पक्क्या अतिक्रमणाचे काय ? छोट्या व्यावसायिकांचा सवाल... बाजारपेठेत अनेक मोठ्या व्यवसायिकांनी दुकानासमोर बांधले पक्के ओटे व रॅम्प

जितेंद्र कोठारी, वणी: नगरपालिकेकडून सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. आज या मोहिमेचा दुसरा दिवस होता. आज टिळक चौकातील वनविभागाच्या कार्यालयापासून ते तहसिल कार्यालय, अबकारी विभाग कार्यलय ते न्यायाधिश निवास तसेच पाण्याची टाकी रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आले. अतिक्रमण हटविण्याची कारवाई पालिकेतर्फे आणखी आठ दिवस सुरु राहणार आहे. दरम्यान शहरात अनेक मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर अवैधरित्या पक्के ओटे, पायऱ्या व रॅम्प बांधले आहे. त्यामुळे केवळ छोट्या व्यावासायिकांवरच कारवाईचा हातोडा पडणार की मोठ्या दुकानदारांचेही अतिक्रमण हटवणार असा सवाल छोटे व्यावसायिक उपस्थित करीत आहे.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी टिळक चौक भागात फुटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या टपऱ्या व फळभाजी विक्रेत्याना हटविण्यात आले. तर आज टिळक चौक ते तहसिल कार्यालय रोड, न्यायाधिश निवासासमोरील अतिक्रमण हटवण्यात आले. आधीच सूचना दिल्या असल्याने दुकानदारांनी आधीच शक्य तेवढे अतिक्रमण काढले होते.

शहरात आंबेडकर चौक ते जटाशंकर चौक, महाराष्ट्र बँक चौक ते नगर परिषद रोड, गांधी चौक, तुटी कमान ते तलाव रोड, शिरभाते गल्ली, टिळक चौक ते खाती चौक व इतर अनेक ठिकाणी दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवून विक्री केली जाते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर बांधकाम साहित्य पडून आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर ग्राहकांचे पायदळ चालणे कठीण झाले आहे.

शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवितांना नगर परिषद मुख्याधिकारी व पथकाने कोणत्याही दबावाला बळी न पडता टपऱ्या व फळभाजी दुकानांसह मोठ्या व्यापाऱ्यांनी केलेले तात्पुरते व स्थायी अतिक्रमणही काढावे. अशी मागणी प्रभावित अतिक्रमणधारक दुकानदारांची आहे.

हे देखील वाचा: 

वणीकर खवय्यांना मिळणार आता लाईव्ह किचनचा आनंद… वेदा रेस्टॉरन्टचे आज उद्घाटन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.