Fact Check: वाघाच्या हल्ल्यात जखमी मजुराच्या मृत्यूची केवळ अफवाच….

जखमी मजुराच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा...

जितेंद्र कोठारी, वणी: ब्राह्मणी गावाजवळ गुरुवारी पहाटे वाघाच्या हल्ल्यात जखमी मजुराच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. वाघाच्या मजूर गंभीर जखमी होता. त्याला वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अफवा शहरात पसरली होती. मात्र यात कोणतेही तथ्य नसून जखमी मजुराच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून त्याला शनिवारी डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली. 

सविस्तर वृत्त असे की उमेश पासवान (35) हा बिहार राज्यातील रहिवासी आहे. सध्या निळापूर मार्गे हायटेंशन विद्युत वाहिनीचे कार्य सुरु आहे. इथे अनेक परप्रातिंय मजूर काम करतात. काही मजूर गावालगत शेतात झोपडी बांधून कुटुंबासह राहतात. गुरुवारी पहाटे 4 वाजता दरम्यान उमेश पासवान हा शौचास जाण्यासाठी शेतात गेला होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर जोरदार हल्ला केला. वाघाने उमेशच्या मानेवर व गळ्यावर पंज्याने वार केला. त्यात तो गंभीर झाला.

ब्लँकेटने वाचवला जीव…
सध्या थंडी सुरू झाल्याने उमेश ब्लँकेट पांघरून शौचास गेला होता. वाघाचा हल्ला झाला त्यावेळी त्याने अंगावर ब्लँकेट पांघरली होती. त्यामुळे गंभीर दुखापती पासून तो वाचला. त्याला वणीतील लोढा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या गळ्यावर वाघाच्या पंज्यामुळे चिरला गेला होता. त्यातून बराच रक्तस्राव झाला होता. वाघाने केलेला घाव इतका गंभीर होता की त्याला 100 पेक्षा अधिक टाके मारावे लागले. दुपारी त्याची प्रकृती धोक्याबाहेर होती.

मात्र दिवसभरात जखमीचा मृत्यू झाल्याची अफवा शहरात पसरली. वाघाच्या हल्ल्यामुळे काही काळ तो प्रचंड दहशतीत होता. गळा चिरला गेल्याने व त्यातून अतिरक्तस्राव झाल्याने काही काळ उमेशची प्रकृती गंभीर होती. मात्र डॉ. महेंद्र लोढा यांनी शर्तीचे प्रयत्न करून उपचार केला. शनिवारी त्याला डिसचार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉ. लोढा यांनी दिली. 

हे देखील वाचा: 

शेतकरी मंदिर परिसरात पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

लांडगा बनून वरूण धवणचा धुमाकूळ…. भेडीया- जंगल में कांड रिलिज

 

Comments are closed.