संस्थेवर करण्यात आलेले आरोप खोटे व बिनबुडाचे: ऍड देविदास काळे

पैसे काढण्यासाठी पतसंस्थेत ग्राहकांची झुंबड... बडतर्फ कर्मचारी व अभिकर्त्यांच्या आरोपांमुळे ग्राहकांमध्ये सभ्रम....

विवेक तोटेवार, वणी: रंगनाथ स्वामी पतसंस्थेतून कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचा-यांनी शनिवारी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेत संस्थेवर काही गंभीर आरोप केले होते. या आरोपावर आज संस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचा-यांनी केलेले आरोप फेटाळत संस्थेवर करण्यात आलेले आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचे सांगितले. रंगनाथ चेंबर वणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध आरोपांवर खुलासा केला. तर काही आरोपांना मात्र त्यांनी बगल दिली. दरम्यान दोन दिवसांपासून पतसंस्थेमध्ये ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून आज सकाळी बँक उघडताच लोकांनी पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसून आली. 

30 सप्टेंबर 2022 रोजी संस्थेतून 19 कर्मचारी व दैनिक अभिकर्त्यांना कामावरून कमी करण्यात आले. यामध्ये वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, गडचांदूर, भद्रावती येथील लोकांचा समावेश होता. यात कुणावर पैशाची अफरातफर व कुणावर संस्थेची बदनामी करीत असल्याचा आरोप ठेवत संचालक मंडळ व अध्यक्ष यांनी त्यांच्यावर कार्यवाही केली होती.

शनिवारी दिनांक 28 जानेवारी रोजी कामावरून कमी केलेल्या लोकांनी पत्रकार परिषद घेत संस्थेच्या कारभारावर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय संस्थेची बडतर्फीची कारवाई ही निवडणुकीमुळे असल्याचा आरोप करत त्यांनी अध्यक्ष व संचालक मंडळावर विविध आरोपांच्या फैरी झाल्या. यात यांनी अमर्याद कर्ज वाटप, इंडस्ट्रीज झोनवरील जमिनीवर 5 कोटीचे कर्ज, रंगनाथ चेंबर इमारत खरेदी इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. या आरोपांमुळे ग्राहकांवर परिणाम होण्याची चिन्ह दिसताच त्यावर खुलासा कऱण्यासाठी आज ऍड देविदास काळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

पत्रकार परिषदेत त्यांनी विविध आरोपांवर खुलासा केला. इमारतीबाबत त्यांनी दोन भागीदारांच्या सह्या झाल्या असून एकाची सही बाकी असल्याचे सांगत सदर प्रकरण सध्या न्यायालयात असल्याची माहिती दिली. तसेच जवळील व्यक्तींना कर्ज वाटप केल्या प्रकरणी त्यांनी उत्तरे दिली. सध्या संस्थेत 773.01 कोटी ठेवी आहेत तर 473.50 कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेवर करण्यात आलेले आरोप हे खोटे व बिनबुडाचे आहेत असा खुलासा अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी केला. मात्र काही आरोपांवर व पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.

पैसे काढण्यासाठी ग्राहकांची झुंबड
कामावरून कमी करण्यात आलेले कर्मचारी व अभिकर्ते यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संस्थेबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. त्याचा परिणाम सोमवार उजाडताच दिसून आला. सोमवारी सकाळी पतसंस्था उघडताच पतसंस्थेत ग्राहकांनी पैसे काढण्याकरिता एकच गर्दी केली. संस्थेवर झालेल्या आरोपांमुळे ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर ऍड काळे यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार हे येणा-या काही दिवसात स्पष्ट होईल.

सोमवार व एफडीमुळे बँकेत गर्दी – ऍड देविदास काळे
शनिवार व रविवारी बँक बंद असल्यास सोमवारी बँकेत नेहमीच ग्राहकांची वरदळ असते. शिवाय महिन्याच्या शेवटी एफडी भरण्यासाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. बँकेचे काम हे सुरळीत सुरू असून ग्राहकांमध्ये कोणताही संभ्रम नाही. – ऍड काळे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.