अती घाई संकटात नेई, दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: उभ्या ट्रकला एका दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. कायर मार्गावरील नवरगाव जवळ रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अजय बंडू खैरे (23) असे मृत तरुणाचे नाव असून तो पळसोनी येथील रहिवासी होता. तर प्रशांत विठ्ठल टिकले (25) हा गंभीर जखमी आहे. त्याला चंद्रपूर येथे हलवण्याची माहिती मिळाली आहे.

Podar School 2025

अजय व प्रशांत हे तालुक्यातील पळसोनी येथे राहतात. ते घराच्या बांधकामासाठी मिस्त्रीच्या शोधात होते. त्यांना कायर-मुकुटबन परिसरातील एका मिस्त्रीचा पत्ता मिळाला. त्यामुळे सोमवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अजय व प्रशांत हे पळसोनीवरून त्यांची दुचाकीने (MH34G 4049) मुकुटबन परिसरात गेले होते. तिथे मिस्त्रीला भेटून ते रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वणीसाठी निघाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घरी लवकर पोहोचण्यासाठी ते दोघेही दुचाकीने भरधाव निघाले. कायर मार्गावरील नवरगाव जवळ एक ट्रक उभा होता. रात्रीच्या वेळी हा उभा ट्रक न दिसल्याने दुचाकीची या ट्रकला जबर धडक बसली. या अपघातात चालक अजयच्या डोक्याला गंभीर मार लागला व तो जागीच ठार झाला.

अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. त्यांनी जखमी प्रशांतला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उभे ट्रक झाले यमदूत
गेल्या काही दिवसात उभ्या ट्रकमुळे परिसरात अनेक अपघात झाले आहे. यात अनेकांचा जीव देखील गेला आहे. तर अनेक चालक जखमी देखील झाले आहे. मात्र रस्त्यावर अनेक दिवस ट्रक उभे राहत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. हेच ट्रक आता यमदूत ठरताना दिसत आहे.

Comments are closed.