ध्येयवेडे शिक्षक मनोज सर…

बहुगुणी डेस्क, वणी: निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ… संत तुकाराम महाराजांच्या या उक्ती सांगतात की जर एखादे कार्य दृढ निश्चयातून केले तर कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवता येऊ शकतो. हेच आपल्या कार्यातून दाखवणारे शिक्षक म्हणजे मनोज शंकर ढेंगळे. ते शिरपूर येथील श्रीमती ल. रा. प्राथमिक आश्रम शाळेत गेल्या 13 वर्षांपासून सेवा देत आहेत. मात्र केवळ हिच त्यांची ओळख नसून एक संवेदनशील आणि सृर्जनशील शिक्षक, सामाजिक भान जपणारी व्यक्ती आणि एक कुशल संघटक म्हणूनही त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागात राहून, आपली नोकरी सांभाळून बेलोरा आणि शिरपूर परिसरात शक्य असेल तेवढे सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज दिनांक 2 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा व्यक्तीविशेष लेख…

मनोज शंकर ढेंगळ यांचा 2 मार्च 1987 रोजी बेलोरा येथे जन्म झाला. वडील वेकोलिमध्ये नोकरीला. एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मनोज यांनी गावातच 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते सुंदर नगर येथील वेकोलि कॉलोनीत राहायला गेले. 12 वी नंतर त्यांनी गडचिरोली येथून डीएड पूर्ण केले. 2010 मध्ये ते शिरपूर येथील श्रीमती ल.रा. प्राथमिक आश्रम शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. सामाजिक कार्याची त्यांना लहानपणापासून आवड होती. शिक्षक म्हणून रुजू झाले असले तरी त्यांना सामाजिक कार्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. पुढे त्यांनी नोकरी सांभाळून सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
ग्रामीण भागात शिक्षण झाल्याने मनोज यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय एक शिक्षक असल्याने त्यांनी सर्वप्रथम शिक्षण क्षेत्रातच कार्य करण्याचे ठरवले. त्यांनी समाजकार्याची आवड असलेल्या मित्रांना त्यांनी गोळा केले. शिरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी मनोज ढेंगळे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले तसेच सराव स्पर्धा परीक्षेचे आयोजन त्यांनी केले. उकणी, भालर, निवली, तरोडा, बेलोरा, पुनवट, नायगाव, शिंदोला इ गावात त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सराव परीक्षेचे यशस्वीरित्या आयोजन केले. याशिवाय अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक सहकार्य देखील केले आहे.

मनोज यांना पर्यावरणाची देखील आवड आहे. आपल्या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी वृक्षमित्र म्हणून काम करण्याचे ठरवले. सुंदर नगर ते निवली मार्गावर त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण केले आहे. याशिवाय विविध ठिकाणी त्यांनी वृक्षमित्र म्हणून सेवा दिली आहे. याशिवाय हिवाळ्यात अनाथ मुले, निराधार वृद्ध इत्यादींना त्यांच्याद्वारे स्वेटर व ब्लँकेट वाटप केले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छ. शिवाजी महाराज यांना मनोज आदर्श मानतात. ठिकठिकाणी त्यांच्या छ. शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्याने होतात. यांच्या विचारसरणीतून त्यांना अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. काही काळा आधी शिरपूर पीएचसीमध्ये डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू होता. शिवाय तिथल्या कर्मचा-यांना विविध समस्यांचा सामना करावा लागायचा. शिवाय रुग्णालयाच्या इमारतीची देखील समस्या होती. परिणामी रुग्णांची चांगलीच गैरसोय व्हायची. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी या समस्येचा आमदार यांच्यापासून जिल्हाधिकारी, मंत्रालय पर्यंत ही समस्या नेली. वृत्तपत्राच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला.

त्यांचे जन्मगाव असलेल्या बेलोरा गावात मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी होते. मात्र विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी ग्रामपंचायतीकडे विद्यार्थ्यांना ग्राउंडची सफाई व लाईटींगसाठी मागणी केली. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर बेलोरा गावातील मुलांसाठी प्रॅक्टिससाठी स्वच्छ ग्राउंड उपलब्ध झाले आहे.

शिरपूर या गावातील महाशिवरात्र प्रसिद्ध आहे. लोक दुरदुरून महादेव गडावर दर्शनासाठी येतात. नुकतिच उन्हाची चाहूल लागताना येणा-या या सणात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्याद्वारे स्पॉन्सरच्या सहकार्यातून सरबत वाटपाचा स्टॉल लावला जातो. याशिवाय महाशिवरात्रीनंतर दुस-या दिवशी गावात मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. याची साफसफाई देखील मनोज व त्यांचे सहका-याद्वारा केली जाते.

शिक्षण क्षेत्र असो अथवा अन्य कुठलेही क्षेत्र या क्षेत्रांवर कार्यरत असलेल्या व्यक्ती ध्येयवेड्या असल्या पाहीजेत. ध्येयवेडी माणसे असले की ते क्षेत्रही आपोआप गतिमान होते. ग्रामीण भागात नोकरी सांभाळून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे मनोज ढेंगळे यांनी हेच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याची परिघ जरी लहान असला तरी नोकरी करून सामाजिक भान जपून त्यांनी केलेले कार्य दुर्लक्षीत तर करता येत नाही शिवाय इतरही नोकरपेशा लोकांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादाई आहे. मनोज ढेंगळे – मो.नं. 9623838824

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.