वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी, सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रामपुरा येथे राहणा-या एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरट्याने धाडसी चोरी केली. या घरफोडीत चोरट्यांनी मोपेड, सहा तोळे सोने व काही रोख रक्कम असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी सकाळी ही घरफोडी उघडकीस आली असून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने वणीकरांचे टेन्शन वाढले आहे. तर दुसरीकडे पोलिसांना अद्याप एकाही चोरीच्या प्रकरणाचा छडा लावता आला नाही.  

सविस्तर वृत्त असे की रामकृष्ण माधवराव बोरातवार (80) हे जत्रा मैदान रोडवरील रामपुरा वार्डातील रहिवासी आहेत. त्यांचे जत्रा मैदानावर बिल्डिंग मटेरिअलचे दुकान आहे. 20 वर्षांआधी त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. तर मुलीचे लग्न झाले त्यामुळे घरी दोघेच पतीपत्नी राहायचे. काही दिवसांआधी रामकृष्ण यांची प्रकृती ढासळल्याने ते पत्नीसह चंद्रपूर येथे आपल्या मुलीकडे उपचारासाठी गेले होते. त्यांच्या घराशेजारी असलेल्या माता मंदिरात ते रोज अनेक वर्षांपासून हार चढवतात. या प्रथेत खंड पडू नये म्हणून त्यांनी चंद्रपूरला गेल्यावर हार चढवण्याची जबाबदारी एका ओळखीच्या मुलाला दिली होती.

हार विकत आणण्यासाठी त्यांनी मुलाला त्यांच्या घरील ऍक्टिव्हा ही मोपेड दिली होती. मुलगा दररोज हार चढवून दुचाकी शेजा-यांकडे गाडी ठेवायचा. नेहमीप्रमाणे गुरुवारी दि. 9 मार्च रोजी मुलाने हार चढवून गाडी शेजा-याकडे ठेवली होती. दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी सकाळी मुलगा हार विकत आणण्यासाठी गाडी आणण्यासाठी घरी गेला. मात्र त्याला घरी ठेवलेली मोपेड आढळून आली नाही. त्याने शेजा-यांकडे चौकशी केली असता त्याला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

चोरी झाल्याचा संशय आल्याने मुलाने घराची पाहणी केली. तर त्याला घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळले. कपाट उघडे असलेले आढळले. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्याने याची माहिती घरमालक रामकृष्ण बोरतवार यांना दिली. ते मुलगी व जावयासह संध्याकाळी घरी परतले. त्यांनी घराची पाहणी केली असता देवघरातील डब्यात ठेवलेले पैसे व दागिने त्यांना चोरी गेल्याचे आढळले. त्यांनी याची माहिती तात्काळ पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. घटनेबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

या घरफोडीत चोरट्यांनी चपला कंठी, लक्ष्मी हार, अंगठी, गोफ असे एकूण सुमारे 6 तोळे सोने, सुमारे 5 हजार रुपये रोख (किंमत अंदाजे 3 लाख) व एक मोपेड असा एकूण सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान घरफोडी साठी वापरण्यात आलेले लोखंडी अवजार चोरटे घरीच ठेवून गेले. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याने वणीकर पुन्हा दहशतीत आले आहे.

हे देखील वाचा: 

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी प्रश्न पेटला, संतप्त महिलांची कार्यालयावर धडक

21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

Comments are closed.