ओसाड बगिचात गांजा ओढताना दोन तरुण ताब्यात
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील साई नगरी समोरील नगर पालिकेच्या ओसाड बगिचात पोलिसांनी धाड टाकून दोन तरुणांना गांजा ओढत असताना ताब्यात घेतले. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात तरुण व शाळकरी मुलं गांजाच्या आहारी गेले असून शहरातील ओसाड ठिकाण हे त्यांचा अड्डा बनला आहे. वणी पोलिसांनी ड्रग्स सप्लायरवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा वणीकर व्यक्त करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की वणीतील साई नगरी समोर नगर पालिकेचा बगिचा आहे. सध्या हा बगिचा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ही जागा ओसाड आहे. या ठिकाणी कायम अमली पदार्थांचे सेवन चालते अशी माहिती खबरीकडून पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी दिनांक 3 एप्रिल रोजी संध्याकाळी पावने सात वाजताच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली. सदर ठिकाणी दोन तरुण चिलीमद्वारे धूर काढत असताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले असता त्यांचे डोळे लालसर व तारवटलेले आढळून आले.
त्यांच्या चिलीमची पाहणी केल्यावर पोलिसांना हे तरुण गांजा ओढत असल्याचे दिसले. तरुणांची चौकशी केली असता त्यातील एक तरुण (22) हा सर्वोदय चौक परिसरातील रहिवासी तर दुसरा तरुण (21) हा गाडगेबाबा चौक परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या दोघांवरही गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (NDPS) कायद्याच्या कलम 27 व 8 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर, विशाल गेडाम, माधव शिंदे यांनी केली.
शहरातील ओसाड ठिकाणं बनले गर्दुल्यांचा अड्डा
शहरातील अनेक ओसाड ठिकाणी गांजासारख्या मादक द्रव्यांचे सेवन होते. यात शाळकरी मुलांपासून ते कॉलेजच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. व्यसनाधीन झालेले या मुल व तरुणांना अनेक वर्षांपासून गावातूनच गांजा मिळतो. हे सर्व चांगल्या घरातील मुलं असून या व्यसनामुळे त्यांची तरुणाई व्यर्थ जात आहे. गावाबाहेरील अनेक ओसाड लेआऊट, नदी रोडवरील मैदान, ओसाड बगिचा व मैदान हे सध्या गांजा फुकण्याचे ठिकाण झाले आहे. सदर गांजा हा शहरातूनच पुरवला जात असून हा माल तेलंगणातून येत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या ड्रग सप्लायर्सवर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.