जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा डेपोच्या आड ऑफिसमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरु असताना स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने धाड टाकून दोघांना अटक केली. पोलिसांनी क्रिकेट बॅटिंगसाठी वापरण्यात येणारा पोपटलाईन सुटकेस, लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे. आर.के. कोल डेपोचा मालक अफसर खान पठाण व रियाज सैय्यद असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.
वणी येथील लालपुलिया भागात आर.के. कोल डेपोमध्ये ऑफिसच्या वरच्या खोलीत आयपीएल मॅच वर सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. माहितीवरून एलसीबीचे स्थानिक शाखा प्रमुख सपोनी अमोल मुडे यांनी स्टाफसह शुक्रवार 7 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता आर.के. कोल डेपोवर रेड केली. त्यावेळी ऑफिसच्या वरच्या मजल्यावर 2 इसम हैद्राबाद सनरायजर्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंटस टीममध्ये सुरु असलेल्या आयपीएल मॅचवर ऑनलाइन सट्टा खेलवतांना आढळले.
एलसीबी पथकाने दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव अफसर खान अनवर खान (36) रा. शास्त्री नगर वणी व रिझवान सैय्यद रियाज सैय्यद (22) रा. मोमिनपुरा असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणहुन मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रिंटर, लैंडलाइन फोन तसेच क्रिकेट बॅटिंगसाठी अत्याधुनिक पोपटलाईन सुटकेस जप्त केले. आरोपीची अंगझडती घेतली असता 17 हजार 500 रुपये रोख मिळून आले. दोन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्था.गुन्हा शाखा प्रमुख पोनि प्रदीप परदेशी, सपोनि अमोल मुडे, पोउपनि योगेश रंधे, सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, रजनीकांत मडावी यांनी सायबर सेलच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली.
वणीत आयपीएलचे पर्व सुरु
आयपीएल क्रिकेट लीग सुरु होताच वणी शहरात क्रिकेट सट्टा बॅटिंगचे पर्व सुरु झाले आहे. मटका जुगार आणि क्रिकेट सट्टाचे माहेरघर म्हणून वणी शहराची ओळख विदर्भातच नव्हे तर राज्यात आहे. शहरातील अनेक ठिकाणी लपून छपून सुरु असलेल्या या सट्टा अड्डयांवर दररोज लाखोंची उलाढाल होत असते. राज्यातील व परप्रांतातील शौकीन वणीत येऊन आपले शौक पूर्ण करतात. शहरातील काही प्रख्यात क्रिकेट बुकीवरही पोलिसांची नजर आहे. एप्रिल महिन्या अखेर पोलीस आणखी काही ठिकाणी मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत आहे.
Comments are closed.