भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार, 2 जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरवर बसलेले दोन युवक जखमी झाले. जखमीपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठविण्यात आले आहे. मुकूटबन पाटणबोरी राज्यमार्गावर मांगली गावाजवळ शनिवारी दुपारी 3 वाजता दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. दुर्गेश दडांजे (23) रा. खापरी असे मृत ट्रॅक्टर चालकाचा नाव आहे. तर अभिषेक शंकर लाकडे 21 हा गंभीररीत्या जखमी आहे.

प्राप्त माहितीनुसार मुकूटबन येथील माजी सरपंच शंकर लाकडे यांची तालुक्यातील शेकापूर येथे शेती आहे. लाकडे यांच्या शेतात सध्या मुकुटबन येथील तलावाची गाळ काढून टाकण्याचे काम सुरू होते. ते स्वतःच्या ट्रॅक्टरने हे काम करीत होते. शनिवार 7 एप्रिल रोजी ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये गाळ भरून चालक दुर्गेश शेकापूरला जात होता. त्यावेळी शंकर लाकडे यांचा मुलगा अभिषेक व त्याचा चुलत भाऊ चेतन संतोष लाकडे हा ट्रॅक्टरवर चालकाच्या बाजूने बसले होते.

मुकुटबन येथून 4 किमी अंतरावर मांगली गावाजवळ चालकाचा ट्रॅक्टर वरून ताबा सुटला आणि भरधाव ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरून खाईमध्ये पलटी झाला. यात ट्रॅक्टरच्या खाली दबून चालक दुर्गेश याचा जागीच मृत्यू झाला. तर अभिषेक लाकडे याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर त्याला यवतमाळ पाठविण्यात आले. चालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

Comments are closed.