शहरात डी.जे. चा दणदणाट, मर्यादा पलीकडे आवाजामुळे नागरिक हैराण
जितेंद्र कोठारी, वणी: सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून शहरात जिकडे तिकडे डी.जे. ची धूम ऐकायला मिळत आहे. चौकावर, रस्त्यावर आणि मंगल कार्यालयात मर्यादा पलीकडे गोंगाट करणाऱ्या डी.जे. मुळे शहरातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. ध्वनी प्रदुषण बाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाचे पर्यावरण व ध्वनी प्रदुषण नियंत्रण कायद्याला दररोज पायदळी तुडविले जात असताना पोलिस विभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
शहरात वरोरा रोड, घुग्गुस रोड, नांदेपेरा मार्गांवर अनेक मंगल कार्यालय व मैरिज लॉन्स आहे. बहुतांश वेळ दाट लग्नतिथीला या सर्वच कार्यालयांमध्ये दुपारी आणि सायंकाळी लग्नाचा बार उडतो. तेव्हा या भागातून मार्गक्रमण करताना सर्वांचीच छाती धडधडते. स्थानिक नागरिकांचे तर हाल न विचारलेलेच बरे. लग्न असलेल्या मंगल कार्यालयात मांडवाची सकाळ आणि रात्र ही त्या परिसरातील नागरिकांच्या कानठळ्या फोडणारी असते.
अलीकडे तर हळदी, मेहंदी, बोरवण या अतिरिक्त उत्साह पर्वणींची भर पडल्याने एका दिवसाचा त्रास तीन दिवसांवर गेला आहे, तरी हा स्थानिक मुद्दा ठरून सहसा कुणी तक्रार करण्यास पुढे धजावत नाही. कुणाच्या घरात हृदयरुग्ण अथवा बालक असल्यास विनंती, सूचना होतात. परंतु त्यादेखील कित्येवेळा वादाचे निमित्त ठरतात. ढोलताशे, डीजे, ध्वनिक्षेपक यांचा कानठळ्या बसवणारा दणदणाट मानसिक ताणासोबतच तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरत आहे.
कायदा काय म्हणतो?
पर्यावरण संरक्षण कायदा 1983, ध्वनिप्रदूषण अधिनियम 2000 नुसार आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री 10 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर, फटाके, वाद्य यंत्र वाजविण्यास सक्त बंदी घातली आहे. तसेच सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, ध्वनी विस्तारक यंत्र ठरविलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाजविण्यास बंदी केलेली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 तर रात्रीच्या वेळी 70 डेसिबल आवाजापर्यंत वाद्य यंत्र वाजविण्यास परवानगी आहे. तसेच रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 व रात्री 45 डेसि. मर्यादेत लाऊड स्पीकर वाजवू शकतात. रुग्णालय, शाळा, न्यायालय क्षेत्र शांतता विभागाच्या वर्गवारीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून या क्षेत्रांमध्ये दिवसा 50 व रात्रीच्या वेळी 40 डेसी. इतका असू शकतो.
ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1983 चे कलम 15 प्रमाणे 5 वर्षापर्यंत कैद किंवा 1 लाखाचा दंड अथवा दोन्ही शिक्षाचे प्रावधान आहे. मात्र धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखाविल्या जाईल किंवा मंगल कार्यात विघ्न निर्माण होईल असे तर्क देऊन पोलिस विभाग संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई पासून हात झटकून घेताना दिसतात.
ध्वनी प्रदूषणामुळे अनेक रोगांना आमंत्रण – प्रा. सुरेश चोपणे
आज आपल्याला आवाजाचे वेड लागले आहे. मोठ्या आवाजात आनंदोत्सव साजरा करणे हा आपला छंद झाला आहे. ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा, डोकेदुखी, चिडचिड, निद्रानाश, रक्तदाब, हार्टअटॅक होतो. पण काळजी कोण घेतो? अभ्यास करणारे विद्यार्थी, शांतपणे झोपणारे नागरिक यांचा यात काय दोष आहे? धर्म, उत्सव, परंपरा आपले जीवन समृद्ध करीत असते. कुठलाही देव, धर्म चुकीच्या, बेकायदेशीर गोष्टींना करण्याची परवानगी देत नाही. मग आज देव-धर्माच्या नावावर सुरू असलेली बेबंदशाही कशी आणि कोण थांबविणार?
प्रो. सुरेश चोपणे, पर्यावरण प्रेमी व अभ्यासक, चंद्रपूर
हे देखील वाचा:
नोकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील महिलेची मध्यप्रदेशात विक्री
Comments are closed.